>> अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ फेब्रुवारीपासून
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असले तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे नेमक्या कुठल्या दिवशी राज्य विधानसभेत आपले अंदाजपत्रक सादर करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे काल सूत्रांनी स्पष्ट केले. राज्य विधानसभा अधिवेश ३ फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून ते ७ फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे. दरम्यान, आगामी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे अर्थमंत्री असलेल्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजप आमदारांशी एक बैठक घेऊन त्यांच्याशी अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली. पुढील महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत आगामी अर्थसंकल्पाच्या विविध पैलुंविषयी मुख्यमंत्र्यांनी आमदारांशी चर्चा केली. यावेळी आमदारांनीही आपली मते मांडली. मुख्यमंत्री विविध आमदार व मंत्री यांच्या आगामी अर्थसंकल्पाविषयी सूचना ऐकून घेण्यासाठी लवकरच आमदार व मंत्री यांच्या वैयक्तिक भेटी घेणार असल्याचे काल सूत्रांनी सांगितले.