– हेमंत देसाई
महाराष्ट्रातील या वेळच्या विधानसभा निवडणुकीतील पंचरंगी लढतीचे निष्कर्ष जाहीर होण्यास केवळ काही दिवसांचा अवधी आहे. या लढतीनंतर भाजपा पुढे असेल की कॉंग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादीची स्थिती काय असेल याबद्दल आपण केवळ अंदाज बांधू शकतो. नुकत्याच समोर आलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षात बहुतेकांनी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थात शेवटच्या दिवशी चित्र पालटूही शकते. या निवडणुकांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या १५ वर्षांतील लोकशाही आघाडी आणि २५ वर्षांची युती पूर्णत: मोडीत निघाली. त्यामुळे प्रत्येकजण स्वबळावर निवडणूक लढवत असून कोणताही एक पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकेल असे वाटत नाही. भाजपाने बाजी मारली तरी त्यांनाही परबळाचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास भाजपा आणि सेना एकत्र येऊ शकतील का, सेना आणि मनसे एकत्र येऊन भाजपाचे सत्तेवर बसण्याचे स्वप्न धुळीस मिळवतील का, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापण्याचा प्रयत्न करतील का, अशा अनेक शक्यता संभवतात. यावेळी पंचरंगी लढतीमुळे अनेक पर्याय जुळून येऊ शकतात.गेल्या १५ वर्षांमध्ये आपल्याला ठोकळेबाज राजकारणाची सवय झाली होती. म्हणजे कितीही रूसवे-ङ्गुगवे झाले तरी भाजपा-सेना यांनी मैत्रीचे गोडवे गात एकत्र राहायचे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्परांवर कितीही दुगाण्या झाडल्या तरी शेवटी धर्मांध शक्तींच्या विरोधात ऐक्याची तुतारी ङ्गुंकायचे. महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षता विरुद्ध हिंदुत्व अशा लढाईचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, धर्मनिरपेक्षतावाद्यांनी श्रीकृष्ण अहवालाची अंमलबजावणी केली नाही. धुळ्यातील दंगल आटोक्यात आणणे त्यांना अवघड गेले होते. भिवंडीमध्ये पोलिस चौकी जाळून पोलिसांना ठार मारण्यात आले. त्यावेळीही लोकशाही आघाडी सरकारने कठोर कारवाई केली नाही. सांगली, मिरज ही ठिकाणे अनेक दिवस जातीय दंगलीत जळत होती. तेव्हा धार्मिक सामंजस्य निर्माण करण्यात लोकशाही आघाडीलाही पूर्णपणे अपयश आले होते. अशी आघाडी हिंदुत्ववाद्यांशी कसले दोन हात करणार होती? महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा आणि शिवसेना हे पक्ष परस्परांविरुद्ध उभे ठाकले होते. ठाणे, नाशिक या महापालिकांमध्ये बर्याच गमतीजमती घडल्या. भाजप-मनसेच्या एकत्र येण्यावरूनही बरेच रामायण घडले. अगदी अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात अनंत गीते यांना चिल्लर खाते मिळाले म्हणून सेनेने बरीच आदळाआपट केली. थोडक्यात, महायुती कधीच घट्ट नव्हती.
या पार्श्वभूमीवर आता युती आणि आघाडी ङ्गिस्कटल्यानंतर महाराष्ट्रातील चित्र कसे असेल हा सार्यांच्याच औत्सुक्याचा भाग आहे. त्यामुळेच या निवडणुकांमधील रंगत वाढली आहे. स्वबळावर लढताना जागा वाढतील असा दावा कॉंग्रेसचे नेते करत असले तरी हक्काच्या जागा अडचणीत आल्या असताना हमखास यश मिळवून देणार्या मुंबई, विदर्भ आणि मराठवाड्यात पक्षासमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. यावेळी कॉंग्रेसला भाजपा आणि राष्ट्रवादी असा दोघांशी सामना करावा लागत आहे तर काही मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसची लढत सेनेशी आहे. सत्ता आली नाही तरी चालेल, परंतु कॉंग्रेसला अद्दल घडवायची असा पण अजित पवारांनी केला आहे. कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकत असणार्या मतदारसंघांत राष्ट्रवादीने पाडापाडीचे उद्योग सुरू केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते करत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात दारुण पराभव झाल्याने कॉंग्रेसचे नेते हादरले आहेत. गेल्या वेळी मुंबईत कॉंगे्रसचे १७ उमेदवार निवडून आले होते. यावेळी वातावरण तेवढे आशादायी दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढत कॉंग्रेसला बाजी मारावी लागणार आहे. उत्तर महाराष्ट्र तसेच नंदुरबार जिल्ह्यात कॉंग्रेसला माङ्गक यशाची अपेक्षा आहे. गेल्या वेळी विदर्भात ६२ पैकी २४ आमदार कॉंग्रेसचे होते. यावेळी दहा ते १२ जागा आल्या तरी पुष्कळ झाले अशी स्थिती आहे. मराठवाड्यात गेल्या वेळी कॉंग्रेसला ४६ पैकी १८ जागा मिळाल्या होत्या. त्यातही अशोक चव्हाण यांच्या नांदेड आणि विलासराव देशमुखांच्या लातूरने कॉंग्रेसला महत्त्वाची साथ दिली. परंतु यावेळी लातूरमध्ये दोन किंवा तीन जागांबाबतच हा पक्ष आशावादी आहे. नांदेडमध्ये गेल्या वेळेइतकेच यश मिळण्याची शक्यता आहे.
भाजपाचा यावेळी मुख्य भर आहे तो आयात केलेल्या उमेदवारांवर. त्यामुळे भाजपाच्या नैतिकतेवर डाग पडला असला तरी कोणत्याही मार्गाने अधिकाधिक जागा पदरात पाडायच्याच असा पण या पक्षाने केला आहे. विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला. तेथे कॉंग्रेस विरुद्ध भाजपा अशी मुख्य लढाई आहे. नितीन गडकरींनी नागपूरचा कायापालट केल्याची जाहिरात केली जात आहे. त्याचबरोबर भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ येथेही प्रचंड गुंतवणूक करून मते मिळवण्याच्या योजना आखल्या जात आहेत. सत्तेचा पुरेपूर वापर केला जात आहे. मराठवाड्यात पंकजा मुंडेंनी संघर्ष यात्रा काढून वातावरण मोठ्या प्रमाणात पालटवले आहे. गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे ओबीसी मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाला मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ङ्गायदा होऊ शकतो.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूर, बारामती येथे जंगी सभा घेऊन राष्ट्रवादीचा हा गड उद्ध्वस्त करण्याचे बेत आखले आहेत. या पट्ट्यात भाजपापेक्षा सेनेची ताकद जास्त आहे. उध्दव ठाकरे यांनी या पट्ट्यात अनेक सभा घेतल्या असून उसाचे भाव, वीजटंचाई या प्रश्नांवर गेले काही दिवस ते रान उठवत आहेत. मात्र, या पट्ट्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची बरीच मते आहेत आणि हे दोन्ही पक्ष भाजपाबरेाबर आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
कोकणातील लढाई राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी आहे. सेनेची ताकद मुंबई तसेच कोकणात केंद्रित झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या वेळी नारायण राणे विरुद्ध इतर अशी लढाई होती. यावेळी राणे घराण्याचा पराभव झाल्यास तेथे सेना बाजी मारेल आणि या पक्षाचा आत्मविश्वासही दुणावेल. कोकणात शिवसेना आघाडीवर आहे. १९८५ नंतर मुंबईबाहेर कोकणात शिवसेनेचा जोर वाढू लागला होता. उदाहरण द्यायचे तर १९९० मध्ये सेना-भाजपा युतीने रत्नागिरी मतदारसंघावरील कॉंग्रेसचा झेंडा उतरवला होता. १९९९ पर्यंत भाजपाने हा गड आपल्या ताब्यात ठेवला. परंतु कॉंग्रेसमधून ङ्गुटून राष्ट्रवादीची निर्मिती झाली तेव्हा या पक्षाने भाजपाला पहिल्यांदा आव्हान दिले आणि २००४ मध्ये हा मतदारसंघ भाजपाकडून हिसकावून घेतला. त्यावेळी राष्ट्रवादीने उदय सामंत नावाचा नवखा सैनिक मैदानात उतरवला होता. हेच उदय सामंत पुढे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री झाले. परंतु आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कोकणातील पारडे शिवसेनेच्या बाजूने झुकले आहे. जैतापूर प्रश्नावर केलेल्या आंदोलनाचाही सेनेला लाभ होईल आणि राणेंविरुद्धचा असंतोष एकवटून सेनेचे पारडे जड होईल असे दिसते.
मुंबईमध्ये यावेळी पंचरंगी सामना असला तरी राष्ट्रवादी कुठेच दिसत नाही. मुंबईत राष्ट्रवादी ङ्गारसे हातपाय पसरू शकली नाही. २००९ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबईत खास करून मनसेने बाजी मारली होती. यावेळी मनसेची ताकद कमी झाली असली तरी सेना आणि मनसे यांच्यात ‘प्रॅक्टीकल अंडरस्टँडींग’ होईल असे दिसते. मराठी मतांमध्ये ङ्गाटाङ्गूट होऊ नये असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेल्यास मुंबईत सेना-मनसे बाजी मारू शकतात. मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगवून सेना-मनसेने जाणीवपूर्वक मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मुंबईतील झोपडपट्टीवासीय अनेक वर्षर्ं कॉंग्रेसच्या मागे उभे राहिले आहेत तसेच मुस्लिम मतदारही. मात्र, बदलत्या वातावरणात मुस्लिम समाजाची काही मते भाजपाच्या वाटेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील गुजराती, जैन तसेच मारवाडी समाज बर्यापैकी भाजपाच्या मागे असल्याचे दिसते. तरुण, मध्यमवर्गीय यांच्या मतविभागणीचा लाभ भाजपाला होण्याची शक्यता आहे. कदाचित भाजपा मुंबईत मुसंडी मारू शकेल.
२८८ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. बहुमताची खात्री वाटत असल्यानेच भाजपाने युती तोडली असावी. लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्व चाचण्यांचे अंदाज खोटे ठरवत २८३ जागा मिळवल्या, त्याप्रमाणेच महाराष्ट्रात या वेळच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणले तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रात यावेळी पंचरंगी लढती झाल्याचा ङ्गायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. अर्थात, त्यामुळे खरे परिवर्तन होईल का नाही हे सांगता येणार नाही.