फोंडा (न. वा.)
धावशीरे उसगाव-तिस्क येथील प्राथमिक विद्यालयात अपुर्या शिक्षकांमुळे पालकांनी मुलांसमवेत मंगळवारी दुपारी भाग शिक्षण अधिकार्याच्या कार्यालयावर मोर्चा नेला. संध्याकाळी भागशिक्षण अधिकार्यांनी आवश्यक शिक्षक शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत पाठविणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पालक व मुले माघारी परतली. धावशीरे विद्यालयात पहिली ते चौथीपर्यंत ८२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ४ पैकी २ शिक्षकांना इतर ठिकाणी पाठविल्याने पालकांनी गेले दोन दिवस वर्गावर बहिष्कार घातला होता. मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन खात्यातर्फे पालकांना देण्यात आले. मात्र पालकांनी लेखी स्वरूपात मागणी करून फोंड्यातील भाग शिक्षण अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. पोलिसांनी कार्यालयाच्या बाहेर मोर्चा रोखून धरला. पालकाच्या शिष्टमंडळाने भागशिक्षण अधिकारी अशोक देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर या विषयावर तोडगा निघाला.
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष उल्हास सतरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सध्या विद्यालयात ४ शिक्षक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण खात्याने स्वीकारली आहे. त्यानुसार प्रशिक्षणासाठी पाठवलेली शिक्षिका यापूर्वीच परत पाठविण्यात आली आहे. अन्य एका शिक्षिकेची नेमणूक करण्यात आली असून बुधवारी दुपारी सदर शिक्षिका विद्यालयात दाखल झाल्यांनतर वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी शिक्षिकांची बदली करून पाठविल्या जातात. मात्र राजकीय नेत्याच्या बळावर शिक्षिका अचानक काही दिवसात दुसर्या ठिकाणी बदली करून घेत असल्याने मुलांचे नुकसान होते. त्यासाठी नव्याने पाठविण्यात आलेल्या शिक्षिकेला शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत ठेवण्याचे लेखी आश्वासन भागशिक्षण अधिकार्याकडून घेतले असल्याचे उल्हास सतरकर यांनी सांगितले.
भागशिक्षण अधिकारी अशोक देसाई यांनी बुधवारपासून रोशनी सुरज नाईक ह्या शिक्षिका विद्यालयात रुजू होणार आहेत. त्यामुळे विद्यालयात एकूण ४ शिक्षिका मुलांना शिकविणार असल्याचे सांगितले.