>> लोटली येथे दोन क्रॉसची नासधूस
>> भल्या पहाटे अज्ञातांचे कृत्य
>> पोलिसांसमोर आव्हान
राज्यात धार्मिक स्थळांची तोडफोड करण्याचे प्रकार चालूच असून काल पहाटे समाज विघातक शक्तींनी दक्षिण गोव्यातील लोटली येथील दोन क्रॉसची नासधूस केल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज अमेरिका दौरा आटोपून येत असून धार्मिक स्थळांच्या वाढत्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर ते कोणती भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष आहे.
नासधूस करण्यात आलेले दोन्ही क्रॉस प्रत्येकापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. भल्या पहाटे पाव विक्रेत्याला क्रॉसची अज्ञातांनी नासधूस केल्याचे दृष्टीस पडले. त्यामुळे एका क्रॉसची मोडतोड पहाटे ४ वाजल्यानंतर जवळपास कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञातांनी केल्याचा संशय मायणा – कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांनी व्यक्त केला.
क्रॉसची मोडतोड केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांना कोणतेच ठोस पुरावे सापडू शकले नाही. क्रॉसची मोडतोड करणार्या संशयितांना त्वरित अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. मोडतोड करण्यात आलेले दोन्ही क्रॉस सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. मोडतोड केलेल्या दोन्ही क्रॉसचे हिंदू बांधवांनी हल्लीच नूतनीकरण केले होते.
विशेष म्हणजे दक्षिण गोव्यात जुलै १ पासून आतापर्यंत ११ हिंदू आणि ख्रिस्ती धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली आहे. कुडचडे येथील ख्रिस्ती स्मशानभूमीतील क्रॉस व थडग्यांची मोठ्या प्रमाणात हानी केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांना गुंगारा देत धार्मिक स्थळांवर हल्ले होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
अमेरिका दौर्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उच्च स्तरीय पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन संशयितांना जेरबंद करण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करण्याची सूचना केली होती. उपसभापती मायकल लोबो यांनी तपासकाम सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. मात्र, मंत्री विजय सरदेसाई यांनी संशयितांना गजाआड करण्यास पोलीस सक्षम असल्याचे म्हटले होते.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
राज्यात सध्या प्रार्थना स्थळांवर हल्ले होण्याचे प्रकार चालूच असून त्यामुळे पोलिसांचीही झोप उडाली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विदेशातून आज सकाळी गोव्यात दाखल होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ते कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी विदेशात जाण्यापूर्वी पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन आरोपींना गजाआड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यास सांगितले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग होऊ शकलेला नाही. त्यामुळे वरील कृत्यांमागे कोण आहे, याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर असलेले आव्हान ठरले आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांच्या परिसरातील पोलिसांच्या गस्ती वाढविण्यात आल्या होत्या.
कुडचडे भागात पोलीस पहारा असतानाही स्मशानभूमितील क्रॉस व थडग्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडले तर बुधवारी रात्री लोटली भागातील क्रॉसची मोडतोड करण्यात आली. आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांनी या प्रकारांवर चिंता व्यक्त केली असून जनतेला संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.
तोडफोड केलेल्या धार्मिक
स्थळांचे पुनर्वसन करणार
>> मंत्री विजय सरदेसाई
समाज विघातक लोकांनी पाडलेले क्रॉस किंवा घुमट्यांचे संबंधितांकडून परवानगी घेऊन नव्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय गोवा फॉरवर्डने घेतल्याचे अध्यक्ष तथा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या बर्याच दिवसांपासून वरील प्रकार चालू आहेत. गोव्यात धार्मिक कलह निर्माण करण्याच्या हेतूनेच हे प्रकार सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. पोलीस आपल्या पद्धतीने आरोपींना हुडकून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रत्येक प्रार्थना स्थळासमोर पोलीस पहारा ठेवणे प्रत्यक्षात शक्य नसते, असे सरदेसाई म्हणाले. तोडफोड केलेली धार्मिक स्थळे पहाणे योग्य वाटत नाही. त्यामुळेच पक्षाने या सर्व क्रॉसची पुनर्स्थापना करण्याचे ठरविले आहे. गोमंतकीय जनतेने सहकार्य करावे व समाज विघातक शक्तींच्या या कृत्यांचा सनदशीर मार्गाने निषेध करावा. गोमंतकीयांनी गोयकारपण राखून ठेवावे, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.