धारबांदोड्यातील अपघातात पर्यटकाचा मृत्यू; एक गंभीर

0
3

पेटके-धारबांदोडा येथे काल खनिजवाहू ट्रकला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक पर्यटक जखमी झाला. राहुल बन्सल (19, रा. हरियाणा) असे मृत पर्यटकाचे नाव असून, शौनक प्रभाकर (19, रा. हरियाणा) हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या पर्यटकाला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. अपघात प्रकरणी ट्रकचालक रामा वडार (रा. सिद्धेश्वरनगर उसगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत पावलेला युवक व जखमी युवक हे दोघेही दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीचे विद्यार्थी आहेत. जीए-03-एजे-4840 क्रमांकाची दुचाकी घेऊन ते आपल्या अन्य मित्रांसह कुळे येथील दूधसागर धबधबा पाहण्यासाठी जात होते. पेटके येथील रस्त्यावर खनिज भरून येणाऱ्या जीए-05-टी-2519 क्रमांकाच्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. त्यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित 108 रुग्णवाहिकेतून पिळये आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य केंद्रात पोहचण्यापूर्वी राहुल बन्सल याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या युवकाला अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक रामा वडार याला ताब्यात घेतले आहे. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

पर्वरी अपघातातील जखमी युवकाचे निधन

माडानी-पर्वरी येथे 12 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर स्वयं अपघातात जखमी झालेला ऍलिस्टन जोसेफ रॉड्रिग्स (23, रा. उसकई) याचे गुरुवारी उपचारादरम्यान निधन झाले. ऍलिस्टन हा महामार्गावरील बॅरिकेडला धडकून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार चालू होते.