>> तीन गंभीर जखमी, कार-मिनीबसमध्ये जोरदार धडक
धारबांदोडा येथील धारेश्वरी देवस्थानाजवळ आज (रविवारी) संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास कार व विंगर मिनीबसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण ठार तर सहाजण जखमी होण्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, धारबांदोडा येथील धारेश्वरी देवालयाजवळ कारी व मिनीबस यांची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात आमलीमोळ-चांदोर येथील नारायण देऊ नाईक (६६) यांचा मृत्यू झाला. या अपघातात राहुल नाईक (२७), मिताली नाईक (२३) व शोभना नाईक या खडपाबांध – फोंड्यात राहणार्या जखमींना बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींना तिस्क-उसगाव येथील इस्पितळात उपचार करून घरी पाठवण्यात आले. जखमी झालेल्यामध्ये मयत नारायण यांच्या पत्नी कामाक्षी नाईक यांचाही समावेश आहे.
जीए-०१ आर-८२९० ही कार तांबडीसुर्ल येथून धारबांदोड्याच्या दिशेने येत होती. तर जीए-०५ बी-८२२४ या क्रमांकाची विंगर ही मिनीबस तांबडीसुर्लला जात असताना हा अपघात झाला. भरवेगात असलेल्या दोन्ही वाहनांत जबरदस्त टक्कर झाली. या अपघातात नारायण नाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले असता, त्यांचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नारायण नाईक हे व्यावसायिक आहेत.
या अपघातप्रकरणी विंगर वाहनाचा चालक प्रशांत बोरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फोंडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यात भाग घेतला.