>> जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची माहिती
धारबांदोडा तालुक्यात काजूमळ आणि तातोडी येथे दोन लहान बंधारे बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांनी काजूमळ आणि तातोडी येथील धरणाच्या नियोजित जाग्यांची पाहणी करून सर्वेक्षण सुरू केले आहे. लवकरच दोन्ही धरणांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
उन्ह्याळ्यात तिलारी कालव्याच्या दुरुस्तीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तिलारी कालवा दुरुस्तीसाठी बंद केल्यास उत्तर गोव्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून जलस्रोत आणि पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्यांची संयुक्त बैठक नुकतीच घेण्यात आली आहे. या बैठकीत पाणी व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली आहे.
तिलारी नदीवर पाण्याचा साठा करण्यासाठी बॅरेज बांधण्याची योजना तयार करण्यात येत असून येत्या २ ते ४ महिन्यांत बॅरेजच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. दोन वर्षात बॅरेजचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बॅरेजमुळे उत्तर गोव्यातील पाणी समस्येवर तोडगा निघू शकतो, असे जलस्रोतमंत्री शिरोडकर यांनी सांगितले. राज्यात शेतीसाठी मुबलक पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच फायबर बंधारे बांधण्याची योजना आहे. एका बंधार्यासाठी ५ ते ६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या बंधार्याच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा साठा केला जाणार आहे, असेही मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.