धारगळ पंचायतीची सनबर्नला मंजुरी

0
5

>> पाक्षिक बैठकीत 5 विरुद्ध 4 मतांनी ठराव संमत

>> विरोधी पंच सदस्यांकडून खास ग्रामसभेची मागणी

धारगळ येथील नियोजित सनबर्न महोत्सवासाठी धारगळ पंचायत मंडळाच्या झालेल्या पाक्षिक बैठकीत सनबर्नबाबतचा ठराव पाच विरुद्ध चार मतांनी मंजूर झाला. त्यामुळे नागरिक व विरोधी पंचसदस्य संतप्त झाले असून याबाबतचा निर्णय खास ग्रामसभा बोलावून घ्यावा अशी जोरदार मागणी केली. ग्रामसभेत जर लोकांनी सनबर्नला मान्यता दिली तर आमची हरकत नसल्याचे यावेळी माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक व अनिकेत साळगावकर, पंच अमिता हरमलकर यांनी सांगितले.

धारगळ पंचायतीची बैठक सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.
नियोजित सनबर्न महोत्सवाच्या विरोधात रवािरी 1 डिसेंबर रोजी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी या महोत्सवाला विरोध दर्शवला होता. दुसऱ्या बाजूने काही स्थानिक नागरिक आणि सत्तारूढ पंचायत मंडळाने सनबर्नला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी सभा आयोजित केली होती.
काल सोमवारी दि. 2 रोजी धारगळ पंचायत मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सनबर्नविषयी परवानगी देण्यावर चर्चा झाली. यावेळी सत्तारूढ गटातील पाच पंच सदस्यांनी सनबर्नला परवानगी देण्याचा ठराव मांडला. तर चार विरोधी पंच सदस्यांनी विरोध दर्शवला. यावेळी विरोधकांनी खास ग्रामसभा बोलावून ग्रामसभेमध्ये जर लोकांना सनबर्न हवा असेल किंवा पूर्ण पाठिंबा देत असेल तर आमची हरकत नाही. मात्र लोकांना विश्वासात न घेता पंचायत मंडळाने जो ठराव मंजूर केला तो आम्हाला अमान्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सनबर्न महोत्सव उधळून लावण्याचा इशारा दिला.

सरपंच सतीश धुमाळ यांनी, सनबर्न लोकांना हवा म्हणून सभा आयोजित केली होती. त्या सभेला पंच मंडळासह स्थानिक लोकांची उपस्थिती होती. आम्ही ठराव मंजूर करून या सनबर्नसाठी परवानगी दिलेली आहे अशी माहिती दिली. मात्र यावेळी त्यांनी सनबर्नला परवानगी देण्यासाठी आमच्यावर कसल्याच प्रकारचा व कुणाचाही दबाव नसल्याचे सांगितले. आम्ही सरकारच्या नियमानुसार या महोत्सवाला परवानगी दिली असून स्थानिकांना रोजगार मिळतील. स्टॉलधारकांना त्या ठिकाणी स्टॉल मिळतील. टॅक्सी मोटरसायकल व्यावसायिकांनाही व्यवसाय उपलब्ध होईल. शिवाय पंचायतीला कायद्यानुसार महसूल प्राप्त होणार असल्यामुळे आम्ही याला परवानगी दिल्याचे सरपंच धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी सरपंच धुमाळ यांनी, पंचायतीला कंपनी कचरा वाहन उपलब्ध करून कंपनी देणार आहे. तशा प्रकारची बोलणी झालेली आहे. त्यामुळे आम्ही परवानगी दिल्याचे सांगितले.

विरोधक न्यायालयात जाणार
या बैठकीला उपस्थित असलेले आणि सनबर्न विरोध करणारे माजी सरपंच भूषण नाईक, माजी सरपंच विद्यमान पंच अनिकेत साळगावकर यांनी पंचायतीनेमांडलेला ठराव आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले. यासाठी आम्ही वेळप्रसंगी न्यायालयातही धाव घेणार असल्याचा इशारा दिला. मागच्यावेळी ग्रामसभा झाली होती. त्या ग्रामसभेमध्ये विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता. मग त्या ठरावाचे काय झाले? असा सवाल पंच साळगावकर यांनी करत पुन्हा नव्याने खास ग्रामसभा खास बोलावण्याची मागणी केली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्तारूढ पंचायत मंडळावर सरकारचा मोठा दबाव असल्याचा आरोप केला.
ठरावाच्या बाजूने सरपंच सतीश धुमाळ, उपसरपंच दीप्तीजा नारोजी, अर्जुन कांदोळकर व दाजी शिरोडकर आदींनी मतदान केले. भूषण नाईक, अनिकेत साळगावकर, अमिता हरमलकर व प्रीती कांदोळकर या चार पंच सदस्यांचा विरोधात मतदान केले.

थांबा आणि पहा ः आर्लेकर
धारगळ पंचायतीने ठराव मंजुर केल्यानंतर आमदार प्रवीण आर्लेकर यांनी थांबा आणि पहा असे सांगितले. याबाबत त्यांनी, सनबर्न तरी होऊ द्या, मग बघू काय घडते ते. सनबर्न कसा होतो ते आपल्यालाही पाहायचे आहे असा इशारा दिला.