>> अपघात की घातपात? पेडणे पोलिसांसमोर टेम्पोचालक शोधण्याचे आव्हान
दाडाचीवाडी-धारगळ येथे काल रविवारी रात्री दहाच्या सुमारास एका टेम्पो रिक्षाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे देविदास ऊर्फ देऊ चंद्रकांत कोनाडकर (49 वर्षे, रा. दाडाचीवाडी, धारगळ) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालकाने पलायन केले. त्या वाहनाचा क्रमांक समजू शकला नाही. दरम्यान, हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
सविस्तर माहितीनुसार, टॅक्सी व्यावसायिक असलेले देविदास कोनाडकर हे नागझर येथून आपल्या दुचाकीने (क्र. जीए-11-एफ-3368) घरी येत होते. त्याचवेळी दाडाचीवाडी- धारगळ येथे अज्ञात मालवाहू टेम्पोने मागून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीसह ते रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धडक देणारे वाहन पळून गेले. देविदास कोनाडकर यांना उपचारासाठी कासारवर्णे येथील सरकारी इस्पितळात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवण्यात आला. शवचिकित्सा अहवाल अजून मिळालेला नाही.
या अपघातात सखोल चौकशी सुरू केली असल्याचे पेडणे पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले. नागरिकांचे आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार हा अपघात नसून, घातपात आहे. त्या अनुषंगाने पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे, मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर हे तपास करत आहेत. कोनाडकर यांच्या दुचाकीला जाणूनबुजून धडक दिल्याचे काहींचे म्हणणे असून, त्याबाबतही चौकशी सुरू आहे, असेही जिवबा दळवी यांनी सांगितले.
दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पळून गेल्यानंतर स्थानिक आणि अन्य वाहनचालकांनी नागझर येथे विमानतळाचा मुख्य रस्ता सुमारे तीन तास रोखून धरला होता.
देविदास कोनाडकर यांचा एक कान तुटून पडल्याचे अपघातस्थळी दिसून आले. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच त्यांचे सहकारी मित्र आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला. सोमवारी संध्याकाळी देविदास कोनाडकर यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे.