धान्य घोटाळ्यातील दोन्ही प्रमुख संशयितांना सशर्त जामीन

0
23

येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने स्वस्त धान्य घोटाळ्यातील प्रमुख संशयित सचिन नाईक बोरकर आणि वीरेंद्र म्हार्दोळकर यांना काल सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने स्वस्त धान्य घोटाळाप्रकरणी कुर्टी-फोंडा, कुंडई या ठिकाणी छापे घालून स्वस्त धान्य दुकानांतील तांदुळ आणि गव्हाची १ हजारापेक्षा जास्त पोती ताब्यात घेतली होती. या प्रकरणी दोन ट्रक, एक जीपगाडी ताब्यात घेतली आहे. तसेच पाचजणांना अटक केली होती. या स्वस्त धान्य घोटाळाप्रकरणी प्रमुख संशयित म्हणून सचिन नाईक बोरकर आणि वीरेंद्र म्हार्दोळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे दोघाही संशयितांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने या अटकपूर्व जामीन अर्जावर गेल्या ३० नोव्हेंबरला सुनावणी घेतली होती. पोलिसांनी कट कारस्थान रचून या स्वस्त धान्य प्रकरणात गुंतविल्याचा दावा सचिन नाईक बोरकर यांच्यावतीने करण्यात आला होता.

गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेले तांदुळ, गहू स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे म्हटले आहे. तसेच, या प्रकरणी अटक केलेल्या एका संशयिताने परराज्यातील एका पीठाच्या गिरणीला गव्हाचा पुरवठा केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तथापि, नागरी पुरवठा खात्याने आपल्या धान्य गोदामातील धान्याचा साठा बरोबर असल्याचा दावा केला. पोलिसांनी ताब्यात घेतलेले धान्य राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना रेशनकार्ड धारकांना वितरणासाठी दिले होते, असे म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरी पुरवठा खात्याला स्वस्त धान्य प्रकरणी क्लीन चीट यापूर्वीच दिलेली आहे.