>> नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांतील धान्यसाठा सुरक्षित असल्याचा दावा; गुन्हा अन्वेषणने पकडलेल्या साठ्याविषयी अनभिज्ञ
नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांतील तांदुळ आणि गव्हाचा घोटाळा उघड झालेला असतानाही, खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी खात्याच्या सर्व गोदामांतील धान्यसाठा योग्य प्रमाणात असून, गुन्हा अन्वेषणने पकडलेल्या धान्यसाठ्याविषयी आपणाला काहीही माहिती नाही, अशी सारवासारव काल केली.
मंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी धान्य घोटाळा झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र गोपाळ पार्सेकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे फोंड्यात मोठ्या प्रमाणात पकडलेला धान्यसाठा आला कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या पाच जणांना १ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे, तर फरार दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
गुन्हा अन्वेषण पोलिसांनी सोमवारी रात्री तीन ठिकाणी छापे टाकून गहू व तांदळाचा मोठा साठा जप्त केला होता. नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांतून चोरण्यात आलेला हा धान्यसाठा कर्नाटकातील व्यापार्यांना विकण्यात आला असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र काल नागरी पुरवठा संचालक गोपाळ पार्सेकर यांनी सर्व गोदामांतील धान्याचा साठा व्यवस्थित असून, धान्य पळवण्यात आलेले नाही, अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाच जणांना एक दिवसाची कोठडी; दोघांची अटकपूर्व जामिनासाठी धाव
धान्य चोरी प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना काल न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यात स्वस्त धान्य दुकानदार आणि वाहनचालकांचा समावेश आहे. दुसर्या बाजूला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि फरार असलेल्या सचिन नाईक आणि अन्य एका संशयिताने अटकपूर्व जामिनासाठी उत्तर गोवा व जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
अधिकारी, कर्मचारी आणि दुकानमालकांचे साटेलोटे
नागरी पुरवठा खात्यातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक वर्षांपासून धान्याची लूट चालू आहे. त्यात खात्याचे अधिकारी, स्वस्त धान्य दुकानांचे मालक व गोदामांची जबाबदारी सांभाळणार्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
माध्यान्ह आहाराच्या धान्यातही घोटाळा?
शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देण्यासाठी केंद्राकडून शिक्षण खात्याला धान्याचा साठा पाठवण्यात येत असतो. मात्र शिक्षण खात्याकडे हा साठा ठेवण्यासाठी गोदामे नसल्याने हा साठाही नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात ठेवण्यात येत असतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. या धान्यसाठ्यातही मोठा घोटाळा होत असल्याची चर्चा आहे.
धान्यसाठ्याच्या नोंदीकडे दुर्लक्ष
नागरी पुरवठा खात्याकडे मोठ्या प्रमाणात येणार्या धान्यसाठ्याची व्यवस्थित नोंद ठेवण्यात येत नाही. किती साठा आला, कुणाला किती साठा वितरित केला, याची इत्यंभूत नोंद ठेवण्याची आवश्यकता असताना त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा खात्यातच सुरू आहे.