मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गांधी जयंतीदिनी आवाहन; कुंकळ्ळी व काणकोणातील घटनांच्या पार्श्वभूमीवर सल्ला
राज्यातील लोकांनी सामाजिक सलोखा राखावा. तसेच संयम बाळगावा व उगीच धर्माच्या नावाखाली तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गांधी जयंतीदिनी केले. जुने गोवे येथे गांधी सर्कलजवळ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हल्लीच्या दिवसांत काही विघ्नसंतोषी लोकांनी धर्माच्या नावाने राज्यात तेढ निर्माण करण्याच्या, तसेच आपल्या धर्माच्या नावाखाली वाद उकरून काढून पोलीस स्थानकात तक्रारी नोंद करण्यासाठी धाव घेण्याचे प्रकार सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या लोकांना संयम बाळगण्याचा इशारा दिला.
गोव्याबाहेरून व्यवसायासाठी आलेल्या काही व्यक्ती काणकोणातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप करत 26 सप्टेंबरला काणकोणमध्ये जुलूसला परवानगी नको, अशी मागणी करत हिंदू संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर कुंकळ्ळीत जुलूस काढण्यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील सल्ला दिला.
काल 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जुने गोवे येथील गांधी सर्कलजवळ महात्मा गांधीच्या पुतळ्याला पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाला कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, राज्य मुख्य माहिती आयुक्त अरविंद नायर, राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे, स्थानिक सरपंच, पंच सदस्य व अन्य मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत देश हा महासत्ता व्हावा हे भारतीयांचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय ठेवले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा. तसेच सत्य व अहिंसेच्या मार्गाच्या अवलंब करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
देशाला स्वच्छतेचा कानमंत्र दिलेल्या महात्मा गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेचे काम केले होते. पंतप्रधान मोदी यांनीही हे स्वच्छता अभियान पुढे नेले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील सर्व लोकांपर्यंत वीज, पाणी, रस्ते तसेच कल्याणकारी योजना पोहोचाव्यात यासाठी आपले सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्वयंपूर्ण गोव्यासाठी सरकारने काम हाती घेतले आहे. तसेच सर्व गरीब तसेच दिव्यांग यांच्या कल्याणासाठीही सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आणि कोणीही सरकारच्या सेवेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणारे अंतोदय तत्व हे राज्य सरकारने स्वीकारल आहे. राज्य सरकार स्वयंपूर्ण गोवा मोहिमेच्या माध्यमातून गोव्यातील प्रत्येक गाव आणि शहर आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सर्व तरुणांना कुशल बनविण्यासाठी कौशल्य शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, तद्नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राजेश फळदेसाई आणि इतर मान्यवरांनी पंचायत आवारात भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती
साजरी केली.