धर्मांतराचे प्रकार थांबायला हवेत : एदुआर्द फालेरो

0
115

देशात जे संघटित धर्मांतर किंवा पुनर्धर्मांतराचे काम चालू आहे ते थांबायला हवे, असे माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले.
अशा प्रकारची संघटित धर्मांतरे ही धार्मिक स्वातंत्र्याच्या किंवा अभिव्यक्तीच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. ही धर्मांतरे भारतीय घटनेचा भंग करणारी आहेत. धर्मांतरविरोधी कायदे करूनही काहीही साध्य होणार नाही. उलट असे कायदे केल्यास धार्मिक शत्रुत्व व तेढच निर्माण होण्याची भीती असल्याचे फालेरो म्हणाले. या उलट देशातील सर्व प्रमुख धर्मांच्या गुरुंनी स्वतःवरच आचारसंहिता लावून घेतल्यास धर्मांतरासारख्या गोष्टींना आपोआप लगाम बसू शकेल, असे फालेरो म्हणाले. देशातील दलितांची स्थिती अत्यंत दयनीय असून त्यांची गरिबी व दारिद्य्र याचा फायदा उठवत त्यांची धर्मांतरे केली जातात ही गोष्ट लक्षात घेऊन या दलितांच्या विकासासाठी पावले उचलण्याची गरज आहे. खास करून या दलितांना चांगले शिक्षण, आरोग्य व रोजगार उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे फालेरो यांनी स्पष्ट केले.
मागच्या वेळी जेव्हा केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आले होते, तेव्हा ख्रिस्ती मिशनरीज देशात धर्मांतरे करीत असल्याचे आरोप संसदेत झाले होते. त्यावेळी म्हणजेच २००४-२००५ साली आपण विविध राज्यांत जाऊन अभ्यास केला होता, असे फालेरो म्हणाले. जम्मूमध्ये एका विदेशी मिशनरीने दोन विद्यालये वसतीगृहासह सुरू केली होती. त्यातून ४० मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षण व जेवण मोफत देण्यात येत असे. हा मिशनरी धर्मांतराच्या इराद्याने हे काम करीत असल्याचा समज झाल्यानंतर जम्मूतील बिशपने त्यांना विद्यालये बंद करण्याचा आदेश दिला होता याची आठवण त्यांनी करून दिली. १९९९ साली ओरिसा येथे दलितांचे धर्मांतर करीत असल्याच्या संशयावरून ग्रॅहम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली होती. काही वर्षानंतर ख्रिस्ती धर्मांतराच्या प्रश्‍नावरून आवाज उठवणारे स्वामी लक्ष्ममणानंद सरस्वती या हिंदू साधूची माओवाद्यानी हत्या केली होती. २००५ साली ओरिसातील मयुरबंज येथील दारिद्य्रात खितपत पडलेल्या दलितांच्या सेवेसाठी ख्रिस्ती मिशनरीनी छोटी आरोग्य केंद्रे व शाळा सुरू केल्या होत्या. तेथे रोज धर्मांतर विरोध दर्शविणारे मोर्चे होत असत. मी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना अहवाल सादर करून तेथील लोकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाव्यात अशी सूचना केली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
२००५ साली महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याला मी भेट दिली होती. मध्यप्रदेशातून आलेले दलित तेथे राहत असत. मध्यप्रदेशातील ३६ गावांतून आलेले हे लोक होते. पैकी राजूरा या एका गावात आलेले दलित हेच तेवढे ख्रिस्ती होते. अयोध्येतून आलेल्या हिंदूंनी या दलितांना ख्रिस्ती दलितांबरोबर संबंध न ठेवण्याचा इशारा दिला होता. शेवटी त्यांनाही हिंदू धर्म स्वीकारावा लागला होता, असे ते म्हणाले. आपण वेगवेगळ्या राज्यांना भेटी देऊन पाहणी केली असता अशा प्रकारचे चित्र आपणाला पहावयास मिळाले होते, असे ते म्हणाले.