धरसोड पक्षांतरे

0
55

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणाचे मासलेवाईक उदाहरण म्हणून कुडतरीचे माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या धरसोड पक्षांतरांकडे पाहावे लागेल. रेजिनाल्ड सुरवातीला कॉंग्रेस सोडून आम आदमी पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात होते. तेव्हा राज्यात आम आदमी पक्षाने प्रचंड जाहिरातबाजी करून आपली हवा निर्माण केली होती. त्याच्या प्रभावाखाली येऊन आपल्या वाढदिवशीच रेजिनाल्ड आपमध्ये प्रवेश करणार होते, परंतु राहुल गांधींनी कॉंग्रेस न सोडण्याचे आवाहन केल्यानंतर रेजिनाल्ड यांचे मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी कॉंग्रेसमध्येच राहायचा इरादा स्पष्ट केला. परंतु रेजिनाल्ड कॉंग्रेसमध्ये समाधानी नव्हते. भाजपने अन्य पक्षांतील आमदार व उमेदवार यांची पळवापळवी सुरू केली तेव्हा रेजिनाल्डही त्यांच्या गळ्याला लागणार असे चित्र तयार झाले. भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि रेजिनाल्ड एकाच हॉटेलमध्ये आढळल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या. परंतु आपल्या मतदारांना आपला भाजप प्रवेश रुचणार नसल्याचे ठाऊक असल्याने रेजिनाल्ड यांनी तो विचार बदलला आणि आपण भाजपात जाणार नसल्याचे रक्ताने लिहून देतो असे निक्षून सांगितले. परंतु भाजपमध्ये जाणार नाही हे सांगत असताना कॉंग्रेस सोडणार नाही असे मात्र ते म्हणाले नव्हते. तृणमूल कॉंग्रेसने गोव्यात आयपॅकच्या सहाय्याने आपला धडाका लावताच कॉंग्रेसच्या संथगतीच्या राजकारणाला कंटाळलेले रेजिनाल्ड तृणमूलमध्ये धावले. कॉंग्रेस पक्ष व नेतृत्वावर त्यांनी दुगाण्याही झाडल्या. कॉंग्रेसने आपल्या निवडणूक समितीत आणि उमेदवारांच्या पहिल्याच यादीत स्थान दिलेले असतानाही रेजिनाल्ड यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करणे हा कॉंग्रेससाठी मोठा झटका होता. राज्यातील कॉंग्रेस दुबळी झालेली आहे, ती निर्नायकी स्थितीत आहे, समविचारी पक्षांशी युती करण्याबाबतही ती चालढकल करते आहे आणि अशा परिस्थितीत ती सत्ताधारी भाजपचा सामना करू शकणार नाही असे वाटल्याने रेजिनाल्ड यांनी तृणमूलचा आसरा घेतला होता. परंतु तृणमूलने मगो पक्षाशी हातमिळवणी केली आणि रेजिनाल्ड पेचात आले. मतदारसंघात त्यांच्या तृणमूल प्रवेशासंदर्भात मोठी नाराजी दिसून आली. कॉंग्रेसनेही त्यांच्या मतदारसंघात सभा घेऊन रेजिनाल्डविरोधी वातावरणनिर्मितीचा प्रयत्न केला. तृणमूलवर बाहेरचा पक्ष असल्याची छाप आहे आणि गृहलक्ष्मी कार्ड, युवा शक्ती कार्ड, जमीन व घरमालकीची भरघोस आश्वासने देऊनही ती अद्याप पुसली जाऊ शकलेली नाही. त्यामुळे कुडतरीचे मतदार अशा पक्षाला कितपत स्वीकारतील या शंकेने रेजिनाल्ड यांना घेरले. त्यांच्या घरवापसीमध्ये भाजप सोडून कॉंग्रेसवासी झालेल्या मायकल लोबो यांचा हात आहे असे दिसते, कारण लोबो कॉंग्रेसमध्ये गेल्यापासून दुबळ्या गणल्या जाणार्‍या कॉंग्रेसला नवी संजीवनी मिळाल्यासारखे झाले आहे. बदललेल्या समीकरणांमुळे रेजिनाल्ड यांना कॉंग्रेसमध्ये परत जावेसे वाटू लागले आहे. परंतु त्यांची इच्छा असली तरी त्यांच्या स्वागतासाठी कॉंग्रेस काही हातात माळ धरून बसलेली नाही. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
रेजिनाल्ड यांचे प्रतिस्पर्धी मॉरेन रिबेलो भाजपात गेले होते. पण रेजिनाल्ड तृणमूलमध्ये जाताच ते भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेशले. कॉंग्रेसमध्ये कुडतरीच्या जागेसाठी त्यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे रेजिनाल्ड भले परत यायला उत्सुक असले तरी पक्षात त्यांच्या घरवापसीबाबत नाराजी आहे. त्यामुळे त्यांचे थंडे स्वागत होते आहे. अर्थात, रेजिनाल्ड यांच्या उपयुक्ततेची जाणीव कॉंग्रेस पक्षाला आहे. मायकल लोबो आता कॉंग्रेसची सूत्रे हलवू पाहातील, परंतु दिगंबर कामतादी ज्येष्ठ नेते त्याला कितपत वाव देतील हे पाहावे लागेल. मायकल लोबोंच्या महत्त्वाकांक्षेला कॉंग्रेस नेतृत्वाने वाव दिला नाही, तर तेही वेगळी वाट चोखाळणे काही अशक्य नाही.
वास्तविक, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे गोव्याच्या राजकारणातील एक उमदे आशास्थान आहे. ज्या धडाडीने त्यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनांमध्ये भाजपाच्या सरकारचा एकहाती मुकाबला केला तो खरोखर कौतुकास्पद होता. आपल्या विशिष्ट शैलीत प्रश्न विचारण्याची त्यांची हातोटी तर वाखाणण्याजोगी होती. त्यातून आपली एक अभ्यासू आमदार अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. परंतु ज्या प्रकारे त्यांनी पक्षांतरांबाबत धरसोड वृत्ती दाखवली, त्यातून त्यांची प्रतिमा काळवंडली आहे. त्याचा फटका निवडणुकीत कितपत बसतो त्यावर त्यांचे राजकीय अस्तित्व ठरेल.