
चेन्नईन एफसीचा मध्यरक्षक धनपाल गणेश याच्यासाठी श्री कांतिरवा स्टेडियमच्या आठवणी संमिश्र ठरल्या आहेत. शनिवारी बंगळुरू एफसीविरुद्ध मैदानावर उतरताना त्याची भावना अशीच असेल. याच स्टेडियमवर मार्च २०१५ मध्ये स्टीफन कॉन्स्टंटाईन यांनी धनपालला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली.
इराणविरुद्ध विश्वचषक पात्रता लढतीत तो खेळला. गुरप्रीत सिंग संधू याची सुद्धा ही पहिलीच लढत होती. गोलरक्षक गुरप्रीतने काही वेळा चपळ बचाव करीत वाहवा मिळविली, पण धनपाल याला दुखापतीमुळे १४व्या मिनिटालाच मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो उर्वरित मोसमास मुकला. अशावेळी चेन्नईन एफसीने त्याच्या क्षमतेवरील विश्वास कायम ठेवत त्याचा करार एका वर्षाने वाढविला. गेल्या मोसमात तो चेन्नई सिटीकडून आय-लीगमध्ये खेळला. यंदा तो आयएसएलमध्ये महत्त्वाचा खेळाडू म्हणून नावारुपास आला.
सुमारे तीन वर्षांनंतर तो कांतिरवा स्टेडियमवर पुन्हा परतला तेव्हा त्याने सामना संस्मरणीय ठरविला. त्याने बंगळुरूविरुद्ध अंतिम टप्यात केलेला गोल निर्णायक ठरला.या गोलमुळे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांना त्याच्यावर टाकलेला विश्वास सार्थ असल्याचेच दिसून आले. त्यामुळे शनिवारी तो कांतिरवा स्टेडियमवर उतरेल तेव्हा त्याच्या आशा पल्लवित झाल्या असतील. आपल्या खात्यात एखादा गोल नोंदविण्याची सुद्धा त्याला आशा असेल. मोसमाच्या प्रारंभी एफसी गोवाविरुद्ध त्यांनी धनपालला संधी दिली नाही. त्यावेळी हा मध्यरक्षक पुढे खेळेल की नाही अशी शंका निर्माण झाली होती, पण त्याचे महत्त्व ग्रेगरी यांच्या लक्षात लवकरच आले. त्यामुळे चेन्नईसह धनपालचे नशीबही पालटले.