‘धनत्रयोदशी’चा महिमा…

0
15
  • रमेश सावईकर

धार्मिक सलोखा, समानता आणि शांती या मूल्यांचा संदेश देणारा दीपावली हा प्रकाशाचा उत्सव. सर्व मनुष्यमात्रांत या मूल्यांचा दीप सदैव तेवत राहून विश्वशांती निर्माण व्हावी आणि दीपावलीच्या खऱ्या प्रकाशाने मानवजीवन प्रकाशमय होवो अशी दीपावलीनिमित्त शुभकामना!

दीपावली म्हणजे दीपांच्या प्रकाशाचा उत्सव. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयापर्यंत सलग पाच दिवस साजरा करण्यात येणारा हा उत्सव. धार्मिक विधी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येणारी दिवाळी हा हिंदूंचा एक मुख्य सण. पाचही दिवस साजरा करण्यात येणाऱ्या या सणाचा प्रत्येक दिवस हा आगळा-वेगळा! प्रत्येक सणाचे धार्मिक, पारंपरिक व सांस्कृतिक महत्त्व वेगळे. पण मूळ उद्दिष्ट एकच- जे मंगल आहे, जे सत्य आहे, जे शिव आहे त्याचा नेहमीच विजय होतो. हा विजय साजरा करण्याचा हा दीपावली उत्सव होय. तिमिरावर प्रकाशाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय हा ठरलेलाच आहे. वैदिक काळापासून ते पुराणकाळापर्यंत आणि अगदी आजच्या आधुनिक काळातही आपणाला याची प्रचिती येते. अशा ज्या घटना घडल्या त्यांची माहिती पुराणकाळातील कथांतून मिळते. त्या घटनांची स्मृती म्हणून विजयोत्सव साजरा केला जातो. विजयोत्सवाची भावना विविध प्रकारे व्यक्त होते. त्या मूल्यांचा प्रकाश आपल्या जीवनात पडो अन्‌‍ आपले जीवन कृतार्थ होवो हाच उद्देश असतो.

आश्विन वद्य द्वादशी तिथी दिवशी गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे. या सणाला ‘गोवत्सपूजा’ किंवा ‘वसूबारस’ असेही संबोधले जाते. आपल्या धर्मात गाईला पवित्र मानले जाते. गोमातेचे पूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. महिला गोवत्स गाईची हळद-कुंकू, फुले अर्पण करून पूजा करतात. तिला मिष्ठान्न नैवेद्य म्हणून खाऊ घालतात आणि गोमातेचा कृपाशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थना करतात.

आश्विन वद्य त्रयोदशी तिथीला ‘धनत्रयोदशी’ किंवा ‘धनतेरास’ असे म्हणतात. मूळ दोन संस्कृत शब्द एकत्र येऊन ‘धनत्रयोदशी’ हा शब्द बनला आहे. धन हा संपत्तीचा प्रतीकात्मक शब्द, तर त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस. ‘धनतेरास’ या शब्दाची व्युत्पत्तीही तशीच आहे. धनाची देवता ही लक्ष्मीदेवी आहे. म्हणून त्या दिवशी लक्ष्मीदेवीची पूजा करण्यात येते आणि तिची कृपा आपल्यावर सदैव राहावी म्हणून प्रार्थना केली जाते. श्रीलक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन, तिने आपल्याला संपत्ती, धनधान्य प्राप्त होण्यासाठी कृपाशीर्वाद द्यावा म्हणून देवीचे यथोचित स्वागत हिंदू भाविक करतात. ज्या ठिकाणी स्वच्छता आहे, ज्या ठिकाणी प्रकाश आहे, मंगलमय वातावरण आहे तिथे लक्ष्मीदेवी थांबते अशी श्रद्धा आहे. म्हणून तिचे स्वागत करण्यासाठी घराची सफाई करून रंगरंगोटी केली जाते, प्रांगणात लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढली जाते आणि मातीच्या पणत्या पेटवून घराच्या प्रवेशभागात प्रकाशमय वातावरणाची निर्मिती केली जाते.

धनत्रयोदशीला लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि लोकांना धनप्राप्तीचा कृपाशीर्वाद देते, अशी हिंदूधर्मीयांची श्रद्धा आहे. या श्रद्धेला पुराणांतील कथांचाही आधार आहे. पौराणिक कथेनुसार एकदा लक्ष्मीदेवीने भगवान विष्णूला आपल्यासोबत पृथ्वीवर येण्याची विनंती केली. ती त्यांनी एका अटीवर मान्य केली. लक्ष्मीदेवीने पृथ्वीवरील सौंदर्य-सृष्टीच्या मोहात पडू नये व दक्षिण दिशेला पाहू नये. लक्ष्मीने ही अट मान्य केली. नंतर भगवान विष्णूसह ती पृथ्वीवर अवतरत असता ‘चंचल’ बनली आणि दक्षिण दिशेकडे पाहत राहिली. पृथ्वीवरील शेतकऱ्याच्या शेतात लावलेल्या मोहरीच्या झाडांची पिवळी फुले व ऊस पाहून लक्ष्मी त्यांच्या मोहात पडली.
भगवान विष्णू लक्ष्मीच्या या कृतीने क्रोधीत झाले व बारा वर्षे पृथ्वीवरच राहण्याची सजा तिला देऊन परत गेले. शेतकऱ्याच्या घरी लक्ष्मीने निवास केल्याने तो श्रीमंत झाला. बारा वर्षांचा कालावधी कधी लोटला हे लक्ष्मीला कळलेच नाही. एकदा साध्या माणसाच्या वेशात भगवान विष्णू पृथ्वीवर लक्ष्मीला नेण्यासाठी परत आले असता शेतकऱ्याने लक्ष्मीदेवाला परत पाठविण्यास हरकत घेतली. त्यावेळी लक्ष्मीदेवीने आपले खरे रूप प्रकट केले आणि ती भगवान विष्णूसह परत निघाली. जाताना तिने शेतकऱ्याला सांगितले की दरवर्षी आपण या तिथीला पृथ्वीवर एका दिवसासाठी अवतरणार. त्या दिवशी आश्विन वद्य त्रयोदशी होती.
या घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी धनत्रयोदशीचा सण धार्मिक विधीसह मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. धनाची देवता ‘कुबेर’ ही असल्याने भगवान कुबेराचीही पूजा, आराधना व प्रार्थना धनत्रयोदशीला करतात.

धनत्रयोदशी तिथीला मृत्यूची देवता यमराज याने आपल्या दूताना सांगितले की, जो कोणी या दिवशी दीपदान करील त्याला अपमृत्यूचे भय राहणार नाही, अपमृत्यू असल्यास तो टळेल. म्हणून या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून दीप प्रज्वलित करून ठेवला जातो.
धनत्रयोदशीला घरासमोर उंच ‘आकाशकंदील’ लावतात. तो देवता, पितर, यमराजासाठी लावला जातो. त्याच्यासाठी हा दिवा लावल्याने देवता, पितर, यम संतुष्ट होतात अशी श्रद्धा आहे.

धनत्रयोदशीला आयुर्वेदात फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. आयुर्वेदाचा देव भगवान धनवंतरीची षोडषोपचार पूजा करून त्याचा कृपाशीर्वाद लाभण्यासाठी प्रार्थना करतात. त्याच्या कृपेने निरामय आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभते. आयुर्वेदिक उपचार घेणारे भक्तगण तसेच आयुर्वेदिक वैद्य भगवान धनवंतरीची पूजा श्रद्धेने, भक्तिभावे करतात. धनत्रयोदशीला कचरा, अस्वच्छता दूर करण्यासाठी वापरली जाणारी ‘झाडू’ हिला स्वच्छतेची देवता लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याचीही प्रथा आहे. आंघोळीसाठी जो मोठा कुंभ (मडकी) वापरतात, त्याची यथासांग पूजा करून त्याला धनत्रयोदशी दिवशी दही-पोह्यांचा नैवेद्य दाखविण्याचीही प्रथा आहे.
धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मी प्रसन्न व्हावी, तिचा कृपाशीर्वाद लाभून धन-संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून तिचे पूजन करणे, स्तोत्रपठण करणे, लक्ष्मीची आरती म्हणणे, दिवसभर उपवास करून रात्रो पूजा करणे आणि समारोप झाल्यानंतर उपवास सोडणे व लक्ष्मीला दाखविण्यात आलेला दही-पोह्यांचा नैवेद्य मग सेवन केला जातो. लक्ष्मीची पूजा करण्याची वेळ ही स्थिर लग्न पाहून- विशेषतः वृषभ लग्न स्थिर असल्याने- त्या शुभमुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मीदेवी समुद्रमंथनाच्या वेळी क्षीरसागरातून प्रगट झाली. ती धनाची देवता आहे, म्हणून आश्विन वद्य त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ संबोधतात. ‘धनवंतरी’ हा भगवान विष्णूचा अवतार असून समुद्रमंथनाच्या वेळी धनवंतरी अमृताचा कुंभ घेऊन प्रगटला, म्हणून त्या देवाची पूजा या तिथीला केली जाते. भगवान कुबेर हा ब्रह्मा असून शरद पौर्णिमेला त्याचा जन्म झाला. धनाचा देव म्हणून धनत्रयोदशीला लक्ष्मीदेवी, कुबेर व धनवंतरीची पूजा करण्याचे महत्त्व मोठे आहे. त्यांचा कृपाशीर्वाद लाभावा आणि आपल्याला निरामय आरोग्य, यश व धनसंपत्ती प्राप्त व्हावी म्हणून या देवतांची प्रार्थना केली जाते.

धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आश्विन वद्य चतुर्दशीला नरकचतुर्दशी म्हणतात. याच दिवशी दिवाळी-दीपावली साजरी करतात. अमावास्येला लक्ष्मीपूजन करतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा व द्वितीया तिथीला यमद्वितीया म्हणजे भाऊबीज हे सण साजरे करण्यात येतात. भाऊबीज हा पाचव्या सलग दिवशी येणारा दिवस. हा दीपावली उत्सवाचा सांगता दिवस. धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत पाच दिवस दीप लावून जीवनातील अंधार दूर करून प्रकाश निर्माण करण्याचा हा प्रकाशोत्सव.

धार्मिक सलोखा, समानता आणि शांती या मूल्यांचा संदेश देणारा दीपावली हा प्रकाशाचा उत्सव. सर्व मनुष्यमात्रांत या मूल्यांचा दीप सदैव तेवत राहून विश्वशांती निर्माण व्हावी आणि दीपावलीच्या खऱ्या प्रकाशाने मानवजीवन प्रकाशमय होवो अशी दीपावलीनिमित्त शुभकामना!