धनखड यांच्या वर्तनामुळे राज्यसभा अध्यक्षपदाच्या प्रतिष्ठेला धक्का : खर्गे

0
4

>> पत्रकार परिषदेत टीकेचे बाण; संविधानाऐवजी अध्यक्षांची निष्ठा ही सत्ताधाऱ्यांसाठी

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनखड यांच्यावर टीका केली, तसेच त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचे कारणही सांगितले. विरोधक जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा अध्यक्ष जगदीप धनखडे हे स्वतः मंत्र्यांसमोर सरकारची ढाल बनून उभे असतात. त्यांच्या या वर्तनामुळे राज्यसभा अध्यक्ष पदाच्या प्रतिष्ठेला, तसेच देशाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. संविधानाऐवजी अध्यक्षांची निष्ठा ही सत्ताधाऱ्यांसाठी आहे. सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण खुद्द अध्यक्षच आहेत, असा आरोपही खर्गे यांनी यावेळी केला.

सभागृहात खासदार म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्ती ह्या अनुभवी नेते, पत्रकार, लेखक, प्राध्यापक आहेत. त्यांना 40-40 वर्षांचा अनुभव आहे, अशा नेत्यांची अध्यक्ष हे मुख्याध्यापकांसारखी शाळा घेतात आणि प्रवचन देतात. विरोधी पक्षाचे लोक 5 मिनिटे बोलले, तर 10 मिनिटे त्यांचे उपरोधिक प्रवचन असते, अशी टीका खर्गे यांनी केली. सभागृहातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे ते आपले विरोधक म्हणून पाहतात. ज्येष्ठ असोत की कनिष्ठ, आक्षेपार्ह वक्तव्य करून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतात, असा आरोपही खर्गे यांनी केला.

अध्यक्ष हे राजकारणाच्या पलीकडे असतात; मात्र आज अध्यक्षांकडून नियम डावलून राजकारण होत आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे पहिले राज्यसभेचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी 1952 मध्ये खासदारांना सांगितले होते. राधाकृष्णन, के. आर. नारायणन, डॉ. शंकर दयाल शर्मा यासारख्या अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तींनी आपल्या कारभारातून आदर्श घालून दिला आहे, असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

अध्यक्षच पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाचे गुणगान करत असतील, तर विरोधकांचे कोण ऐकणार? त्यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक वैर, द्वेष किंवा राजकीय लढा नाही. मात्र संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही अत्यंत विचारपूर्वक आणि नाईलाजाने हे पाऊल उचलले आहे, असेही खर्गे यांनी नमूद केले.
राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्षात अध्यक्षांकडून पहिल्यांदाच पक्षपाती वर्तन झाल्याचा खेद वाटतो. या सगळ्यामुळे विरोधी पक्षांना त्यांच्या विरोधात ठराव आणण्यास भाग पाडले, असे खर्गे म्हणाले. गेल्या तीन वर्षातील त्यांचे वर्तन पदाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. कधी ते सरकारचे गुणगान गातात, कधी स्वतःला आरएसएसचा एकलव्य म्हणवून घेतात. असे वक्तृत्व त्यांच्या पदाला शोभणारे नाही, असेही खर्गे म्हणाले.