धडक कारवाई

0
174

इराणचा वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सुलेमानी आणि पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस किंवा पीएमफ या लढाऊ संघटनेचा नेता अबु महदी यांचा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेने काल खात्मा केला. इराणविरुद्ध गेले काही महिने सतत दंड थोपटत आलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नववर्षातील ही धडक कारवाई मध्यपूर्वेमध्येच नव्हे, तर जगामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे. या कारवाईला इराण कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल, त्यातून युद्धाला तोंड फुटू शकेल का आणि तसे काही झाले तर त्याचे जागतिक राजकारणावर काय परिणाम होतील हा चिंतेचा विषय आहे. हल्ल्यानंतर अमेरिकी नागरिकांचे जीवित सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची भूमिका अमेरिकेने मांडली आहे. तसे पाहता अमेरिकेची सत्तासूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आल्यापासूनच त्यांनी इराणशी वैर बाळगले आहे. ओबामांनी इराणशी केलेला अणू करार ट्रम्प यांनी अमान्य केला तेव्हापासून सातत्याने दोन्ही देशांमध्ये संघर्ष उफाळलेला आहे. इराककडून आजवर अमेरिकेची अनेकदा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कुरापत काढली गेली. गेल्या जूनमध्ये अमेरिकेचे द्रोण पाडले गेले होते तेव्हा ट्रम्प यांनी इराणवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश दिला होता, परंतु नंतर त्यांनीच तो मागे घेतला. त्यानंतर सौदी अरेबियातील दोन बलाढ्य तेल कंपन्यांच्या तेलविहिरींवर द्रोण हल्ले झाले, त्यामागे इराण असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता, परंतु तेव्हाही अमेरिकेने संयम बाळगला. त्यानंतर अबु बकर अल बगदादीविरुद्ध अमेरिकेने धडक कारवाई करून त्याचा खात्मा केला, तेव्हाच सुलेमानीच्या खात्म्याचे आदेशही ट्रम्प यांनी जारी केले होते असे आता सांगितले जात आहे. गेल्या २७ डिसेंबरला बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला होता. त्याचे निमित्त साधत अमेरिकेने सुलेमानी आणि अबु मेहदी यांचा काटा काढला आहे. सुलेमानीची अशा प्रकारे हत्या हा इराणच्या राजवटीसाठी मोठा हादरा आहे. खरे तर त्याच्या मृत्यूच्या अफवा आजवर अनेकदा उठल्या होत्या. २००६ साली विमान दुर्घटनेत तो मरण पावल्याचा कयास व्यक्त झाला होता. त्यानंतर २०१२ साली दमास्कसमधील बॉम्बस्फोटात त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्या. मग २०१५ च्या अखेरीस सिरियातील अलेप्पोवरील कारवाईत तो मारला गेल्याचे सांगितले गेले. मात्र, आता इराणनेच दुजोरा दिलेला असल्याने सुलेमानी ठार झाल्याचा दुजोरा मिळाला आहे. सुलेमानीच्या फौजा केवळ इराणमध्येच नव्हे, तर सिरिया आणि येमेनमध्येही कार्यरत होत्या. लेबनॉनच्या हिजबुल्लासारख्या दहशतवादी संघटनेलाही त्याचेच पाठबळ होते. सिरियामधील बशर असदच्या राजवटीचे समर्थन सुलेमानीचे सैनिक करीत आले होते. जेव्हा सिरियाचा भाग बळकावून आयसिस निर्माण झाली तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी सुलेमानीच्या हस्तकांचा आणी पीएमएफचा वापर सिरियाने केला होता. त्यामुळे आता जेव्हा अमेरिकेकडून तो मारला गेला तेव्हा ‘आयसिसशी लढणार्‍या वीराला अमेरिकेने हुतात्मा केले आहे’ अशी प्रतिक्रिया इराणने दिली आहे. इराकमध्ये सद्दाम हुसेनचा खात्मा अमेरिकेने केल्यापासून तेथेही सुलेमानीचे हस्तक सक्रिय झाले होते. अमेरिका हे सुलेमानीचे नेहमीच लक्ष राहिले. अमेरिकी दूतावासावर व कर्मचार्‍यांवर जेव्हा जेव्हा हल्ले चढवले गेले, तेव्हा सुलेमानीचेच नाव समोर यायचे. अमेरिका व मित्रदेशांच्या तळांवरील हल्ल्यांतही त्याच्यावरच संशय व्यक्त होत होता. त्यामुळे अमेरिकेच्या डोळ्यांत तो नक्कीच खुपत होता. आता त्याचा सफाया झाल्याने अमेरिकेच्या राजकारणातील ट्रम्प यांचे राजकीय वजन वाढले आहे. हे ट्रम्प यांचे फेरनिवडणुकीचे वर्ष आहे हे विसरून चालणार नाही. सध्या महाभियोगाला सामोरे जात असलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून यायचे आहे. त्यासाठी अशा प्रकारची अमेरिकेचे हित जपणारी कारवाई त्यांना राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरणारी आहे. २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे जसे बालाकोट घडले आणि त्याने निवडणुकीची सारी समीकरणेच पालटून टाकली, तसाच काहीसा हा प्रकार आहे. इराणविरुद्धची धग अमेरिका येत्या काही महिन्यांत वाढवत नेईल असा अंदाज आहे. ट्रम्प यांना त्याचा निश्‍चितपणे राजकीय फायदा मिळू शकतो. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने हीच भीती काल व्यक्त केलेली आहे. मात्र, अमेरिका आणि इराण दरम्यानच्या या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि अर्थकारणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. इराणच्या राष्ट्रप्रमुखांनी या हल्ल्याचा अमेरिकेवर सूड उगवण्याचा इशारा दिलाच आहे. कालच्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर क्षणार्धात वाढले. कच्चे तेल हा तर जागतिक अर्थव्यवस्थेचा मध्यबिंदूच आहे. ट्रम्प यांचा लहरीपणा लक्षात घेता ते कधी काय करतील याचा नेम नाही! त्यामुळे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या बदलत्या आक्रमक नीतीचे पडसाद संपूर्ण जगावर पडणे अटळ आहे.