>> केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती, ड्रग्जच्या विरोधात लढण्याचे नागरिकांना आवाहन
देशातील 7 टक्के लोकसंख्या ही ड्रग्ज म्हणजे अमलीपदार्थांच्या आहारी गेल्याचे आकडेवारीतून समोर आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ड्रग्जच्या वाढत्या धोक्याविरोधात लढण्याचे मोठे आव्हान असून, तपास यंत्रणांनी त्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी पडताळणी करण्याचे निर्देशही शहांनी दिले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये ‘ड्रग ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात बोलताना अमित शहांनी ही माहिती दिली.
देशातील 7 टक्के लोकसंख्या ही अवैध ड्रग्जच्या आहारी गेली आहे. ड्रग्ज हा एक प्रकारचा कर्करोग असून, त्यामुळे देशातील एक पिढी नष्ट होऊ शकते. ड्रग्जच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. ड्रग्जच्या विरोधात लढण्याची ही संधी जर आपण आज वाया घालवली तर त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकेल, अशी भीती अमित शहांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी देशात अवैध मार्गाने येणारे 16,914 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात यश आल्याची माहिती अमित शहांनी दिली. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असून, ‘ड्रग डिस्पोजल फोर्नाईट’ या कार्यक्रमाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. त्या माध्यमातून येत्या 10 दिवसांत सुमारे 8,600 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज नष्ट केले जाणार आहेत.
भारत हा केमिकल्सचा जगातील मोठा निर्माता देश असल्याने ड्रग्जविरोधात कारवाईसाठी अडचणी येत असल्याचे अमित शहांनी स्पष्ट केले. काही केमिकल निर्मात्या कंपन्यामधून ड्रग्जची निर्मिती होत असल्याचे गेल्या काही काळात समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अवैधरित्या कार्यरत किमान 50 कंपन्यांवर कारवाई केल्याची माहिती देखील शहांनी दिली.
ड्रग्जविरोधातील कारवाईत सात पटींनी वाढ
सन 2004 ते 2014 या दरम्यान एकूण 3.63 लाख किलो इतके ड्रग्ज पकडण्यात आले होते. पण 2014 ते 2024 या दरम्यान त्या कारवाईत सात पटीने वाढ होऊन 24 लाख कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहिती अमित शहांनी दिली. 2004 ते 2014 या दरम्यान नष्ट केलेल्या ड्रग्जची किंमत ही 8,150 कोटी रुपये इतकी होती. 2014 ते 2024 या कालावधीत त्यामध्ये सात पटीने वाढ झाली. या काळात 56,861 कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट केल्याची माहिती अमित शहांनी दिली.