>> इफ्फीचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; इस्रायलच्या राजदूतांकडून खेद व्यक्त
५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोपावेळी इस्रायली चित्रपट निर्माते तथा इफ्फीचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ हा अश्लील आणि अपप्रचार करणारा चित्रपट असल्याचे जे वक्तव्य केले होते, त्या वक्तव्यानंतर राज्यासह देशभरात तीव्र पडसाद उमटले आणि वाद निर्माण झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॅपिड यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी खेद व्यक्त केला. या चित्रपटात भूमिका साकारलेल्या अभिनेते अनुपम खेर यांनीही लॅपिड यांच्यावर टीका केली.
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्यात राहिला होता. त्यानंतर आता नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ५३वा इफ्फी सोमवारी संपला खरा; पण आता लॅपिड यांच्या वक्तव्यानंतर वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील १५वा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आमच्या मते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा आणि असभ्य चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणे हे अयोग्य आहे, अशी खंत लॅपिड यांनी इफ्फीच्या समारोप सोहळ्यात व्यक्त केली होती.
काल सुरुवातीला इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. नदाव लॅपिड यांना त्यांच्या वक्तव्याची लाज वाटली पाहिजे, असे नाओर गिलोन यांनी म्हटले आहे. मी काही चित्रपटतज्ज्ञ नाही; मात्र असंवेदनशीलपणे आणि पूर्वग्रह दूषित ठेऊन ऐतिहासिक घटनांबद्दल पूर्ण अभ्यास न करता बोलणे चुकीचे आहे. विशेष म्हणजे ही अशी घटना आहे जी आजही भारतासाठी एखाद्या जखमेप्रमाणे असून, अजूनही त्यात अनेकजण भरडले जात आहेत आणि त्याची किंमत चुकवत आहेत. या प्रकरणानंतर भारतातून उमटणार्या प्रतिक्रिया पाहून फार दु:ख होत आहे, असेही गिलोन यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अहमदाबाद-गुजरात येथे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत इफ्फीचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्सवर केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. लॅपिड यांच्या या कृत्यांचा आणि विधानांचा आपण निषेध करतो. धक्कादायक म्हणजे त्यांनी इफ्फीच्या व्यासपीठाचा वापर करून हे विधान केले. एनएफडीसी या प्रकरणाची लवकरच दखल घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, लॅपिड यांच्या या विधानाला अभिनेते अनुपम खेर आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी विरोध केला आहे. देव त्यांना सद्बुद्धी देवो, असे खेर म्हणाले. काश्मीर फाईल्सला अश्लील म्हणता येणार नाही, असे अशोक पंडित यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अन्य इफ्फी ज्युरींनीही या विधानापासून स्वतःला दूर केले आहे. ते त्यांचे (लॅपिड) वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
एनएफडीसी, ईएसजी गंभीर दखल घेणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इफ्फीतील ज्युरी प्रमुख, इस्त्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. इफ्फीच्या व्यासपीठाचा गैरवापर करण्यात आला असून, एनएफडीसी आणि ईएसजी या गोष्टीची गंभीर दखल घेणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अहमदाबाद येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना काल सांगितले.