‘द काश्मीर फाईल्स’बद्दलच्या वक्तव्यावर नदाव लॅपिड ठाम

0
15

नुकत्याच पार पडलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) ज्युरी हेड नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले आणि देशभरातील वातावरण तापले होते. द काश्मीर फाईल्स हा प्रपोगंडा व वल्गर चित्रपट आहे, असे लॅपिड यांनी म्हटले होते. आता नादव यांची आणखी एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. द काश्मीर फाईल्सबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यातून ते आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लॅपिड यांनी त्यांच्यावर होणार्‍या टीकांना काल प्रत्युत्तर दिले. मी जे काही बोललो ते बोलणे सोपे नव्हते. कारण मी भारतात पाहुणा आहे. याच देशात आयोजित एका मोठ्या चित्रपट महोत्सवाचा ज्युरी हेड आहे. अशात याच देशात येऊन असे काही बोलणे सोप्पे नव्हते; पण मी भारतीय नाही. त्यामुळे मला जे बोलायचे होते, तेच मी बोललो. मी विचारपूर्वक बोललो. ज्या देशामध्ये मनातील ते बोलण्याची क्षमता कमी होत आहे, अशा ठिकाणी कुणाला तरी बोलायलाच हवे, असे लॅपिड म्हणाले.

जेव्हा मी ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा पाहिला, तेव्हा मी सुद्धा अस्वस्थ झालो होतो. या विषयावर कोणीही बोलू इच्छित नाही म्हणून मी बोललो. कोणीतरी बोलण्याची गरज होती. माझ्या भाषणानंतर अनेकांनी माझे आभारही मानले, असे लॅपिड म्हणाले.

परिणामांची चिंता केली नाही : लॅपिड
माझ्यासाठी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलणे आणि राजकीय विधाने करणे सोपे काम नव्हते, तरीदेखील मी प्रतिक्रिया दिली. माझ्या मनात भीती होती व अस्वस्थता होती, तरीही मी बोललो, असे नदाव लॅपिड म्हणाले. तसेच मी बोलताना किंवा बोलून झाल्यावर माझ्या वक्तव्याच्या परिणामांची चिंता केली नाही, असेही लॅपिड म्हणाले.