>> पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत भरला राष्ट्रपतीपदासाठीचा अर्ज
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काल संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे बडे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आली आहे. येत्या १८ जुलै रोजी मतदान होणार असून, २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. एनडीए आणि विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. २९ जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, लालन सिंह, पशुपती पारस, रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद हेही प्रस्तावक होते. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मुर्मू यांनी महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यावर आदरांजली वाहिली. तसेच, द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांकडून समर्थन मागितले आहे. सोनिया गांधी, प ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्याकडे त्यांनी समर्थन मागितले आहे.