- वृंदा मोये
(संचालिका, आनंद निकेतन
खोर्ली-म्हापसा)
लग्न झाल्यानंतर निसर्गनियमाप्रमाणे मूल होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण त्या मुलाला सुशिक्षित करण्याबरोबरच सुसंस्कारित बनवणं हे पालकांचं आद्य कर्तव्य ठरतं. कारण पालक हे मुलांसाठी ‘रोल मॉडेल’(आदर्श) असतात आणि घर हे संस्कारांचं विद्यापीठ असतं.
हाती नाही बळ, दारी नाही आड
त्याने फुलझाडं लावू नये
सोसवेना ज्याला संसाराचा ताप
त्याने मायबाप होऊ नये…
… किती खोल अर्थ भरलेला आहे बहिणाबाईंच्या या ओळींमध्ये!! पालकत्वाचं अख्खं सार या ओळींमध्ये त्यांनी आपल्याला सांगून ठेवलंय. हे लिहिण्यामागचं कारण… हल्लीच शाळेत घडलेला एक प्रसंग! सकाळची ती शाळेच्या प्रार्थनेची वेळ होती. पालक आपापल्या मुलांना घेऊन लगबगीनं गेटच्या आत शिरत होते. पाच-सहा वर्षांची कोवळी मुलं असल्याने मुलांना शाळेत सोडायला आणि घ्यायला पालकांना मुलांसोबत येणं भाग होतं. इतक्यात प्रार्थनेसाठी घंटा वाजली आणि आम्ही सगळीजणं प्रार्थनागृहामध्ये एकत्र जमलो. ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ या श्लोकाने प्रार्थनेला सुरुवात झाली. इतक्यात बाहेरून एका मुलाचा मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू आला. थोडा वेळ तसाच जाऊ दिला. बराच वेळ झाला, मुलाचं रडणं काही केल्या कमी होईना. प्रार्थना सुरू असताना आम्ही शिक्षिका मध्येच अर्ध्यावर कधी उठत नसत. पण त्या दिवशी मला त्या मुलाचं रडणं ऐकवेना. हमसून हमसून तो एकसारखा रडत होता. नाईलाजास्तव आणि शाळेतील या विभागाची प्रमुख असल्याकारणाने मी बाहेर आले आणि काय झालंय म्हणून इकडे-तिकडे कानोसा घेतला. शाळेतील मावशीकडून कळलं की राहूल नावाच्या आमच्या एका विद्यार्थ्याला रडत असलेलाच मावशीच्या स्वाधीन करून पालक निघून गेले होते. राहूलला कासावीस होऊन रडताना बघून काळीज पिळवटून निघालं. एवढासा हा निष्पाप मुलगा इतका कशाला रडतोय… कळायला काहीच मार्ग नव्हता. याआधीही राहूल अधूनमधून… ‘घरची आठवण येते, मला आईकडे जायचंय..’ असं सांगून रडत बसायचा. पण थोडीशी समजूत काढली की सगळं विसरून शांत व्हायचा. पण त्या दिवशी मामला काही वेगळाच वाटत होता. राहूलचे आईवडील दोघंही शिक्षित. मध्यमवर्गीय त्रिकोणी कुटुंब. राहूलचे आजी-आजोबा, काका-काकू सगळी घरची इतर मंडळी गावी राहात असत. नोकरीनिमित्त राहूलचे आईवडिल शहरात येऊन स्थिरस्थावर झालेले. राहूल एकुलता एक मुलगा. अत्यंत लाडाकोडात वाढलेला. घरात इन-मिन-तीन माणसं. गोडीगुलाबीनं बोलून आम्ही राहूलला बाजूला नेलं आणि नेमकं काय झालंय ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला. हमसत हमसतच राहूल बोलला… ‘‘काल रात्री माझ्या बाबांनी आईला खूप मारलं. आणि ‘निघून जा घरातून’ असं सांगितलं. आता मी शाळेत असताना मला सोडून आई गेली तर?..’’ या विचाराने अस्वस्थ होऊन राहूल आकांडतांडव करीत होता. राहूलच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे भीति जाणवत होती. घडलेल्या घटनेचा त्याने प्रचंड धसका घेतला होता. मी काय समजायचं ते समजून चुकले. राहूलची कशीबशी समजूत काढली आणि तुझी आई घरीच आहे. तू घाबरू नकोस… असं सांगून त्याला वर्गात पाठवलं. माझ्याही मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली. भीतिने कावरा-बावरा झालेला राहूलचा चेहराच माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागला.
मुलांच्या बालपणी योग्य संस्कार व्हावेत म्हणून एकीकडून आईवडिलांची प्रेमाने सेवा करणार्या श्रावणबाळाची, भक्त पुंडलिक यांच्या गोष्टी वर्गात सांगून आईवडिलांप्रती मुलांचा आदरभाव वाढावा म्हणून प्रयत्न करत होतो तर दुसरीकडून ‘आम्ही आदर्श म्हणून कोणाकडे बघावं?.. असा प्रश्न मला राहूलच्या नजरेत दिसत होता. केवळ शब्दांतून राहूल स्वतःला व्यक्त करू शकत नव्हता. माझ्या जिवाची घालमेल सुरू झाली.
विचार करून डोकं बधिर होत चाललं होतं. एकच प्रश्न मनाला सतावत होता की यात दोष कुणाचा? त्या निष्पाप अजाण बालकाच्या वयाचा की सारंकाही समजून उमजत नसल्याचा आव आणणार्या पालकांचा? लग्न झाल्यानंतर निसर्गनियमाप्रमाणे मूल होणं ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण त्या मुलाला सुशिक्षित करण्याबरोबरच सुसंस्कारित बनवणं हे पालकांचं आद्य कर्तव्य ठरतं. कारण पालक हे मुलांसाठी ‘रोल मॉडेल’(आदर्श) असतात आणि घर हे संस्कारांचं विद्यापीठ असतं. त्यासाठी पालकत्वाचं थोडं तरी ज्ञान पालकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, असं वाटतं. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत मुलांसमोर स्वतःच्या मनाचा तोल ढळू न देण्याची खबरदारी पालकांनी घेतल्यास मुलांना योग्य संस्कार मिळून ती एक सुजाण, सुसंस्कारित व्यक्ती म्हणून समाजात लौकीक मिळवतील यात शंका नसावी!