कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या दोघा रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती काल साथीच्या रोगांच्या विभागातील डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली. या दोघाही रुग्णांना कोरोनासाठीच्या वेगळ्या विशेष विभागात ठेवण्यात आले असून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे की काय हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या रक्ताचे व अन्य नमुने गोळा करून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचे अहवाल गुरुवारी अथवा शुक्रवारी मिळणार असून तोपर्यंत त्यांना इस्पितळात ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गोव्यात संशयावरून दाखल केलेल्या रुग्णांचा आकडा आतापर्यंत ७ वर गेला असून अजून राज्यात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले.