दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे तरुण ठार

0
5

धारबांदोड्यात ट्रकची धडक चुकवताना दुचाकीला अपघात

धारबांदोडा आणि म्हापसा येथे काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. म्हापशातील पहिल्या अपघातात खड्डे चुकवताना दुचाकीची धडक संरक्षक भिंत व झाडाला बसून 25 वर्षीय तरुण ठार झाला, तर देवसडा-धारबांदोडा येथील दुसऱ्या अपघातात ट्रकची धडक चुकवताना दुचाकी कोसळून 20 वर्षीय तरुणाचा जागीच अंत झाला.

देवसडा-धारबांदोडा येथे मालवाहू ट्रकची धडक चुकविण्याच्या नादात दुचाकी रस्त्यावर कोसळून काल झालेल्या अपघातात तुषार नाईक (20, रा. किर्लपाल) याचा मृत्यू झाला, तर अभिषेक गावकर (20, रा. किर्लपाल) हा गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलीस घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातानंतर पलायन केलेल्या ट्रकचालकाचा फोंडा पोलिसांकडून शोध सुरू होता.

प्राप्त माहितीनुसार, जीए-12-बी-6818 क्रमांकाची दुचाकी घेऊन तुषार आणि अभिषेक हे दोन तरुण काल सकाळी 11.30 च्या सुमारास धारबांदोडा येथे जात होते. देवसडा येथील उतरणीवर पोहचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या केए-08-0379 क्रमांकाच्या ट्रकला बसणारी धडक चुकविण्याच्या नादात दुचाकी रस्त्यावर कोसळून हा अपघात घडला. दोघेही तरुण रस्त्यावर कोसळताना ते ट्रकच्या टायरला धडकले. गंभीर जखमी झालेल्या तरुणांना पहिल्यांदा पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तुषार नाईक याची तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या अभिषेक गावकर याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर व अन्य पोलिसांनी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. अपघातानंतर पळ काढलेल्या ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.

दरम्यान, नागझर-कुर्टी येथील अंडरपासजवळ दोन कारची समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात कारमधील सर्वजण सुखरूप बचावले आहे. अंडरपासजवळ अपघात घडत असल्याने सर्व्हिस रोडवर गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे.

म्हापशात खड्डे चुकवताना दुचाकीला स्वयंअपघात

म्हापसा येथील कुचेली-मार्ना रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याकडील संरक्षक भिंत व झाडाला धडकली. या भीषण स्वयंअपघातात समीर उदय नाईक (25, रा. थिवी, मूळ रा. सांघवी-पुणे) हा ठार झाला.
हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजता घडला. समीर हा आपल्या दुचाकीने (क्र. एमएच-14-एमएन-7492) शिवोलीहून मार्नामार्गे कुचेलीकडे जात होता. कुचेली पेट्रोल पंपजवळ रस्त्यावरील खड्डे चुकविताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी प्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्याला व नंतर फणसाच्या झाडाला जोराने धडकली. समीरने हेल्मेट घातले होते, मात्र अपघातादरम्यान त्याचे तोंड जोरात झाडाला आपटल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. म्हापसा पोलीस उपनिरीक्षक मंगेश पाळणी व हवालदार तुषार रेडकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
समीर नाईक हा आर्किटेक्ट होता व आसगाव येथील एका रिसॉर्टमध्ये कार्यरत होता. मूळ गाव कारवार असल्याने समीरच्या पार्थिवावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.