दोन वर्षांनी यंदा होणार पायी आषाढी वारी

0
18

>> विठुरायाचे भक्त आणि वारकरी सुखावले; २१ जूनला करणार प्रस्थान

गेल्या दोन वर्षांतील कोरोनाचे संकट निवळल्यानंतर यंदा प्रथमच आषाढीचा पायी वारी सोहळा होणार आहे. दोन वर्षे आषाढीला एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपुरात नेल्या जात होत्या. आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे निश्‍चित झाले असून, विठुरायाच्या भक्तांमध्ये आणि वारकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी २१ जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.

पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले. त्यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वाढ झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकर्‍यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशीही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील यांनी दिली.

मंगळवार दि. २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आषाढी पायी वारी आळंदी येथून प्रस्थान करेल. दि. २२ आणि दि. २३ रोजी पुणे, दि. २४ आणि दि. २५ रोजी सासवड, दि. २६ रोजी जेजुरी, दि. २७ रोजी वाल्हे, दि. २८ आणि दि. २९ रोजी लोणंद, दि. ३० रोजी तरडगांव, दि. १ आणि दि. २ जुलै रोजी फलटण, दि. ३ रोजी बरड, दि. ४ रोजी नातेपुते, दि. ५ रोजी माळशिरस, दि. ६ रोजी वेळापूर, दि. ७ रोजी भंडीशेगाव, दि. ८ रोजी वाखरी, तर दि. ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी पायी वारी पोहोचेल. रविवार दि. १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.