दोन वर्षांनंतर राजधानी पणजीत ‘घुमचे कटर घुम…’

0
18

>> पणजी शिगमोत्सव समिती अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांच्याकडून कार्यक्रम जाहीर

पणजी शिगमोत्सव समितीतर्फे यंदा राजधानी पणजीत शिगमोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे कार्यक्रमात खंड पडला होता. यंदा येथील आझाद मैदानावर उभारण्यात येणार्‍या भव्य रगंमंचावर बुधवार दि. २३ मार्चपासून नाट्यप्रयोग, भावगीत कार्यक्रम, लावणी असे कार्यक्रम रंगणार आहेत. पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष तथा धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी काल पत्रकार परिषदेत या उत्सवाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला.

यानिमित्त दि. २३ रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘ओंकार मेलोडीज’ हा विविधरंगी गीतांचा ऑर्केस्ट्रा सादर होईल. दि. २४ रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘शांताबाई डॉट कॉम’ हे विनोदी नाटक सादर होईल. दि. २५ रोजी संध्याकाळी ७ वाजता ‘सांज सुरांची’ ही मराठी भावगीत व चित्रपटांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. दि. २७ रोजी लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत यांचा ‘अप्सरा आली’ हा लावणी नृत्याचा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे.

२६ रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक
राजधानी पणजीत शनिवार दि. २६ रोजी निघणार्‍या शोभा यात्रेत भव्य चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य, वेशभूषा कलाकार यांचा समावेश असेल. चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य या स्पर्धांसाठी एकूण सहा लाखांहून अधिक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. चित्ररथासाठी प्रथम बक्षीस ६०,००० रुपये द्वितीय ५०,००० रुपये, तृतीय ४०,००० रुपये अशी बक्षिसे दिली जातील. तसेच धेंपा उद्योग समूहातर्फे अनुक्रमे १५ हजार, १० हजार व १० हजार अशी बक्षिसे असतील. पाच चित्ररथांना अनुक्रमे ३०, २०, १५, १२, १० आणि ८ हजार रुपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. याशिवाय ६ हजार रुपयांची १६ आणि ५ हजार रुपयांची ४ बक्षिसे दिली जातील.
रोमटामेळासाठी प्रथम बक्षीस ३५ हजार रुपये, द्वितीय २५ हजार रुपये व तृतीय १५ हजार रुपये आणि धेंपो उद्योग समूहातर्फे अनुक्रमे १५, १० आणि १० हजार रुपये अशी बक्षिसे दिली जातील. चौथे व पाचवे बक्षीस अनुक्रमे १० व ८ हजार रुपये असे आहे. शिवाय प्रत्येकी सात हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे मिळतील.

लोकनृत्यसाठी प्रथम बक्षीस २० हजार रुपये, द्वितीय १५ हजार रुपये, तृतीय १० हजार रुपये अशी बक्षिसे मिळतील. तसेच प्रत्येकी ५ हजारांची ३, ३ हजारांची ५ आणि २ हजारांची ४ बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
वेशभूषा स्पर्धेतील वरिष्ठ गटासाळी प्रथम ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये व प्रत्येकी १ हजार रुपयांची अकरा उत्तेजनार्थ बक्षिसे असतील. छोट्या गटासाठी प्रथम २५०० रुपये, द्वितीय १५०० रुपये व तृतीय १००० रुपये आणि प्रत्येकी ५०० रुपयांची दहा उत्तेजनार्थ बक्षिसे असतील.

या स्पर्धांसाठीचे प्रवेश अर्ज पणजी शिगमोत्सवाच्या कार्यालयात दि. १८ मार्चपासून सकाळी ११ ते दुपारी १ व संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत उपलब्ध असतील.

लोकसंस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी उपक्रम : धेंपे
ग्रामीण भागात आपली खरी लोकसंस्कृती आहे, त्याचे दर्शन पणजी शहरात घडवावे आणि पर्यटकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, म्हणून गेली ३४ वर्षे पणजी शिगमोत्सव समितीतर्फे शिगमोत्सव साजरा केला जात आहे. सांतिनेझ काकुलो आयलँडकडून दि. २६ रोजी संध्याकाळी ४ वाजता शोभा यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर ही शोभायात्रा रात्री १० वाजेपर्यंत आझाद मैदानावर विसर्जित होईल. पारितोषिक वितरण सोहळा व तीन ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार स्वतंत्रपणे नंतर करण्यात येईल, अशी माहिती देखील श्रीनिवास धेंपे यांनी दिली.

आज आझाद मैदानावर गुलालोत्सवाची उधळण
शुक्रवार दि. १८ रोजी रंगपंचमी दिवशी ‘ओम बिटस्’ वाद्यवृंदाच्या (ऑर्केस्ट्रा) तालावर आझाद मैदानावर गुलालोत्सवाची उधळण होणार आहे. पर्यटन खाते आणि पणजी महानगरपालिका यांच्या सौजन्याने होणार्‍या गुलालोत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता पणजी शहराचे प्रमुख दैवत श्री महालक्ष्मीला नमन करून होईल.