दोन वर्षांच्या आत राज्यातील सर्व किनार्यांवर शौचालये, लॉकर सेवा, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या आदींची सोय करण्यात येणार असल्याची माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन, आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. काही किनार्यांवर यापूर्वीच शौचालयांची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, बर्याच किनार्यांवर ही बांधकामे करण्यास सीआरझेडकडून परवाने मिळाले नसल्याने असुविधा निर्माण झाली असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
गोव्यात लाखोंच्या संख्येने सध्या देशी व विदेशी पर्यटक येत असून ह्या पर्यटकांना खरे आकर्षण असते ते गोव्यातील किनार्यांचे. मात्र, तेथे गेल्यावर शौचालये, लॉकर सेवा, समुद्रात आंघोळीला जाण्यापूर्वी अथवा जाऊन आल्यानंतर कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या आदी सुविधा नसल्याने पर्यटकांची फार मोठी अडचण होत असते. ही साधनसुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून निधीही मिळालेला आहे.
मात्र, ही साधनसुविधा उभारण्यासाठी सीआरझेडकडून परवानगी मिळत नसल्याने अडचण निर्माण झालेली आहे. मात्र, येत्या २ वर्षांत सर्व किनार्यांवर वरील साधनसुविधा उभारण्यात येणार असल्याचे काब्राल यानी स्पष्ट केले.
विशेष व्यक्तींसाठी रॅम्प
विशेष व्यक्तींना किनार्यावरून चालत पाण्यापर्यंत जाता यावे यासाठी दक्षिण गोव्यातील कोलवा व उत्तर गोव्यातील कळंगुट अथवा बागा या किनार्यावर एक लाकडी रॅम्प उभारण्याचा विचार असल्याचेही काब्राल यांनी यावेळी सांगितले. तसेच काही किनार्यांवर विशेष व्यक्तींसाठी वेगळी शौचालये उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.