गणेशोत्सवातही जनजागरण करण्याचा भाषा मंचाचा निर्णय
इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध रक्षाबंधन, सार्वजनिक गणेशोत्सव आदी सणांच्या माध्यमांतूनही करण्याचा निर्णय भारतीय भाषा सुरक्षा मंचाने घेतला असल्याची घोषणा काल मंचाच्या निमंत्रक शशिकलाताई काकोडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जनतेने या उत्सवांच्या माध्यमातून मातृभाषांवरील अन्यायाचा विषय मांडावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. मातृभाषेवरील अन्यायाबाबत संदेश देणार्या किमान दोन लाख राख्यांचे वाटप करण्याचे मंचाने ठरवले असून गणेश देखाव्यांमधून शैक्षणिक माध्यमाचा विषय मांडावा, आरत्या, गजर, आवाहनातही मातृभाषांवरील अन्यायासंदर्भात समर्पक श्लोकांचा वापर करावा असे आवाहन काकोडकर यांनी जनतेला केले आहे.
सरकारने ज्या प्रकारे मराठी व कोकणीचा गळा आवळला, त्यासंबंधी सामान्यजनांत आता प्रचंड जागृती झालेली असून येत्या निवडणुकीत कॉंग्रेस सरकार उलथून टाकल्याशिवाय पर्याय नसल्याचे काकोडकर यांनी सांगितले. हा लढा भाजपा व रा. स्व. संघाचा असल्याचा अपप्रचार विरोधक करीत आहेत. या लढ्यात खरे तर समविचारी शक्ती एकत्र आली आहे. डिचोली व म्हापसा येथे मराठी राजभाषेच्या नावाखाली सभा घेणार्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वश्रृत असल्याचे त्या म्हणाल्या.
सर्वप्रथम भाषा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्या मृत झाल्यास राजभाषा करून उपयोग काय, असा प्रश्न काकोडकर यांनी केला. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्या लोकांकडे मंच दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील विद्यार्थीशक्ती या प्रश्नावर जागृत होऊन संघटित झाली आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी काणकोण येथे जाहीर सभा होणार आहे, तर दि. ६ रोजी संध्याकाळी पाच वाजता मडकई मतदारसंघातील दोन खांब, कपिलेश्वरी मैदानावरही सभेचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील केजी नियमित करून त्या देशी भाषांतून चालवाव्यात हे मंचाचे धोरण आहे. इंग्रजीचा वापर करणार्या केजींना कोणीही थारा देऊ नये, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी यांनी केले.
येत्या दि. १५ ऑगस्ट रोजी राजधानीतून भजनी कलाकार महादिंडी काढणार असल्याची माहिती यावेळी काकोडकर यांनी दिली. राज्यातील नव्वद टक्के मुलांना इंग्रजी हवी आहे असे सरकार सांगत असले, तरी शिक्षण खात्याच्या अहवालामुळे ते खोटे ठरले आहे असे काकोडकर म्हणाल्या. या पत्रकार परिषदेस प्रा. सुभाष वेलिंगकर, किरण नायक, नागेश करमली, अरविंद भाटीकर व सुभाष देसाई उपस्थित होते.
दरम्यान, भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या नेतृत्वाखाली राज्यभर इंग्रजी माध्यमास विरोधाचे कार्यक्रम सुरूच आहेच. यात विद्यार्थ्यांनीही उत्साहाने भाग घेतलेला आहे. काल कुडचडे येथील श्रीमती चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमास अनुदानाच्या निर्णयाचा निषेध नोंदवून त्यासंबंधीच्या परिपत्रकाची होळी केली. दि. १५ ऑगस्ट रोजी पणजीत विद्यार्थ्यांनी जमून शक्तीप्रदर्शनात भाग घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.