दोन मंत्र्यांतील वाद शमला

0
3

नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे अखेर पेल्यातील वादळ ठरले. ओडीपीच्या विषयावरून राणे आणि मोन्सेरात यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. तथापि, भाजपच्या बैठकीनंतर दोघाही मंत्र्यांनी सारवासारव करून वादावर तोडगा निघाल्याचे जाहीर केले.

नगरनियोजन खाते ओडीपीबाबत निर्णय घेतना मंत्री आणि आमदारांना विश्वासात घेत नाही, असा आरोप महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केला होता. त्यानंतर नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी मोन्सेरात यांच्यावर टीका केली होती. तथापि, भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर दोघाही मंत्र्यांनी सारवासारव सुरू केली. प्रत्येकाला आपले काम करून घेण्याचा अधिकार आहे. नवरा-बायकोत भांडणे होतात. बाबूश आणि माझे नाते तसेच आहे, असे विश्वजीत राणे म्हणाले.
आपण आणि मंत्री राणे एकाच कुटुंबातील आहोत. पणजी, ताळगावच्या बाह्य विकास आराखड्याबाबत (ओडीपी) चर्चा करून या विषयावर तोडगा काढला आहे. दोन्ही ओडीपी प्रत्यक्षात उतरतील, असे बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. असे असले तरी भाजप सरकारच्या दोन मंत्र्यांतील धूसफुस उघड झाली आहे. मात्र तूर्त वाद शमला आहे.