>> ट्रक-दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी मृत्यूमुखी
>> हरवळेतील घटना; एक वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
पाळोळे येथे मंगळवारी दोघा तरुण-तरुणींचा बुडून मृत्यू आणि त्याच दिवशी म्हापशातील अपघातात एका दुचाकीचालक ठार झाल्याची घटना ताजी असतानाच काल सकाळी हरवळे येथे एक मन सुन्न करणारा अपघात घडला. हरवळे येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा अवघ्या 1 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. किशोर नाईक (30) आणि अर्चना नाईक (23, दोघेही रा. संसारवाडा, खालचे हरवळे) अशी मृतांची नावे आहेत. त्यानंतर काल सायंकाळी कुंडई येथील धोकादायक वळणावर झालेल्या दुसऱ्या एका अपघातात एका भुसारी दुकानावर मालवाहू कंटेनर ट्रक कोसळून एक जण ठार, तर पाच जण जखमी झाले. त्याशिवाय काल रात्री म्हापशातील अपघातात एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला. दरम्यान, नानोडा-डिचोली येथे काही दिवसांपूर्वी कदंब बस व अल्टो कारमधील अपघातात गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचेही काल निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुपाची पूड येथील होंडा-हरवळे हमरस्त्यावर जीए-01-यू-3244 क्रमांकाचा ट्रक होंडाच्या दिशेने जात होता, तर त्याच बाजूला होंडाच्या दिशेने किशोर नाईक, त्यांची पत्नी आणि एका वर्षाचा मुलगा सिद्धांत असे तिघेजण जीए-04-एच-0347 क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. यावेळी ट्रकने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यात ट्रकची धडक दुचाकीला असून, पती व पत्नी असे दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघांनाही साखळी इस्पितळात दाखल केले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या एक वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला गोमेकॉत हलवण्यात आले आहे.
एक वर्षाचा मुलगा पोरका
किशोर नाईक हे आपल्या पत्नी व मुलासह नातेवाईकाकडे जाण्यासाठी निघाले होते. होंडाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि होत्याचे नव्हते झाले. किशोर नाईक यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या अपघातात आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांचा एक वर्षाचा मुलगा पोरका झाला आहे.
ट्रकचालकास अटक
या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
‘त्या’ जखमी चालकाचाही मृत्यू
नानोडा-डिचोली येथील हमरस्त्यावर कदंब बस व अल्टो कारची टक्कर होऊन काही दिवसापूर्वी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते. त्यातील जखमी चालक आशिष अनंत परब (रा. 42, रा. साळ) याचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
अन्य दोन अपघातांत
पोलीस शिपायासह तिघे जखमी
काल दिवसभरातील अपघातांची मालिका रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिली. काल रात्री 9 च्या सुमारास कामरखाजन-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर कारला दुचाकीची मागाहून धडक बसून, पेडणे पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई प्रजय तळवणेकर हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास पणजीतील अटल सेतूवरील कारच्या स्वयंअपघातात दोघे जखमी झाले, त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले.
कुंडईत दुकानात घुसला ट्रक; एकजण ठार
>> 5 जण गंभीर जखमी; गाय देखील मृत्यूमुखी, दुकानासह देवळीही जमीनदोस्त
मानवाडा-कुंडई बाजार येथील मुख्य रस्त्यालगतच्या एका दुकानात काल सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केरळ येथील कंटेनर थेट घुसला. त्यात संपूर्ण दुकान कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात पश्चिम बंगाल येथील सुकेश बासक (32) हा मजूर दुकानाच्या ढिगाऱ्याखाली अडकून जागीच ठार झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात एका गाय देखील मृत्यूमुखी पडली. जखमी व्यक्तींवर फोंडा उपजिल्हा इस्पितळात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघा जणांना अत्यवस्थ स्थितीत गोमेकॉत पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास केरळ येथील कंटेनर (क्र. केएल-07-सीपी-2580) मानसवाडा-कुंडई येथील वळणावर पोचला असता, धोकादायक वळणामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटून तो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात शिरला. हा अपघात इतकाच प्रचंड मोठा होता की ज्या दुकानात कंटेनर शिरला ते दुकान पूर्णपणे कोसळले. दुकानातील साहित्य व सामान रस्त्यावर विखुरले गेले. कंटेनरचाही चक्काचूर झाल्याने परिसरातील सर्व रस्त्यावर सामान विखुरले होते. याशिवाय दुकानाच्या बाजूला असणारे लक्ष्मी देवीची छोटेखानी देवळीही जमीनदोस्त झाली.
अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हा अपघात इतका प्रचंड होता की, गावातील लोकांना काहीच कळायला मार्ग नव्हते. या अपघातानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेतला; पण लोक अडकून पडल्याने शक्य झाले नाही. त्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. रात्री 9 वाजेपर्यंत मदतकार्य राबविण्यात पोलीस व दलाचे जवान व्यस्त होते.
मानसवाडा-कुंडई येथे ज्या ठिकाणी अपघात घडला आहे, ते ठिकाण धोक्याचे असून, यापूर्वीही या ठिकाणी जीवघेणे अपघात घडले आहेत. ग्रामसभेतही याविषयी स्थानिकांनी विषय लावून धरत या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी केलेली आहे. आतातरी संबंधितांनी जागे होऊन हे तीव्र वळण धोक्याचे ओळखून या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी लोकांनी केली आहे.
… म्हणून मोठा अनर्थ टळला
मानसवाडा-कुंडई येथे ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी दररोज मासळी विक्रेत्या बसत असतात. काल ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ह्या महिला त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा स्थानिकांत सुरू होती.
बिहारचा व्यक्ती चालवायचा दुकान
आजच्या अपघातात नेस्तनाबूत झालेले दुकान बिहार येथील व्यक्ती उमेश कुमार हा भाडेपट्टीवर चालवत होता. काल दुपारी ते जेवणासाठी दुकानातून घरी गेले होते. त्यानंतरच्या वेळेत त्यांचा भाचा हा दुकानात होता. या अपघातात त्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. कुंडई येथील विशांत विश्वनाथ नाईक यांनी पाच वर्षांच्या करारावर हे दुकान चालवण्यास दिले होते.
अपघातातील जखमींची नावे
दर्शनी गावडे (45, रा. मानसवाडा-कुंडई), लक्ष्मी जल्मी (65, रा. मानसवाडा-कुंडई), विश्वजीत मस्कर (29, रा. कुंडई), उमाजी दीपक नानूसकर (31, रा. तिरोडा-सावंतवाडी), बिजली थॉमस (28, रा. कोची-केरळ) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. त्यातील दोघा जणांवर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत, तर इतरांवर फोंडा उपजिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.