सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी चिंबल येथील एका व्यक्तीला 4.7 लाखांना गंडा घातला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी सुनील कुमार आणि अनिल यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपींनी चिंबल येथील एका व्यक्तीशी मोबाईलवरून संपर्क साधला. आपण सीबीआयचे दिल्लीतील अधिकारी आहोत. अमलीपदार्थ तस्करी आणि मानव तस्करीच्या प्रकरणामध्येतुझ्या नावाचा समावेश आहे. या प्रकरणातून तुला बाहेर काढण्यासाठी ठरावीक रक्कम बँक खात्यात भरण्याची सूचना त्यांनी केली. त्या सूचनेप्रमाणे चिंबल येथील व्यक्तीने 4.7 लाख रुपयांचा भरणा बँक खात्यात केला. भामट्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
दरम्यान, ऑनलाईन पद्धतीच्या फसवणूक प्रकरणी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी केले. अशा प्रकारांबाबत जवळचे पोलीस स्थानक किंवा सायबर विभागाला माहिती द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.