>> मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास
गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचाच विजय होणार आहे. उत्तर गोव्यात 1 लाख तर दक्षिण गोव्यात 60 हजार एवढ्या मताधिक्क्याने भाजपचा विजय होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. इंडिया आघाडीला आपला पराभव होणार आहे, हे कळून चुकलेले असून त्यांच्या देहबोलीतूनही पराभव दिसत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दक्षिण गोव्यातील फोंडा, शिरोडा, मडकई, सांगे, सावर्डे, काणकोण या मतदारसंघांत भाजपला मोठी आघाडी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. दक्षिण गोव्यातील फक्त 7 मतदारसंघात भाजप मागे पडला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दक्षिण गोव्यातून आपल्या उमेदवार पल्लवी धेंपो यांचा 60 हजार एवढ्या मताधिक्क्याने विजय होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर उत्तर गोव्यातून पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक हे तब्बल 1 लाख मतांची आघाडी घेऊन विजयी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्ष व त्यांचे सहकारी मित्र पक्ष हे जात व धर्मांचे राजकारण करीत आहेत. तर भाजप विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करीत आहे. आम्ही विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इंडिया आघाडीतील एका पक्षाचा मुख्यमंत्री हा तुरुंगात असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस अलाएन्स जनतेला खोटी आश्वासने देत असून अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण तसेच एसटी मुख्यमंत्री देणार असल्याचे खोटे आश्वासन ते देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एसटीच्या राजकीय आरक्षणाची सगळी प्रक्रिया भाजपने पूर्ण करून ठेवली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेश भाजप अध्यक्ष तानावडे यांनी, उत्तर तसे दक्षिण गोव्यातून भाजपचेच उमेदवार विजयी होणार आहेत. दोन्ही ठिकाणी इंडिया अलाएन्सचा पराभव हा निश्चित असल्याचे सांगितले.
भाजपने तीन महिन्यांपूर्वीपासूनच शिस्तबद्धरितीने उत्तर व दक्षिण गोव्यात आपले प्रचार कार्य सुरू केले होते आणि जनतेकडून पक्षाला उदंड प्रतिसाद तेव्हापासूनच मिळत होता, असे तानावडे पुढे म्हणाले.
भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवा श्रीपाद नाईक यांनीही यावेळी बोलताना उत्तर तसेच दक्षिण गोव्यातून पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.