दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसचाच विजय होईल : अमित पाटकर

0
15

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचाच विजय होईल, असा विश्वास काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते व दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, कुंकळ्ीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोण्याचे आमदार कार्लुस फेरेरा व केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा हे हजर होते.

दक्षिण गोवा लोकसभा मततदारसंघात भाजपला निवडणूक जड जाणार असून तेथे त्यांचा पराभव होऊ शकतो, याची कल्पना भाजपला आली आहे आणि म्हणूनच भाजप तेथे आपला उमेदवार जाहीर करण्यास विलंब लावत आहे. उत्तर गोव्यात काँग्रेस व भाजपला विजयाची समान संधी आहे; मात्र उत्तरेतही यावेळी काँग्रेस पक्षाचाच विजय होईल, असा विश्वास पाटकर यांनी
व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी पक्षाने यापूर्वीच प्रचाराचे काम सुरू केले आहे, असे पाटकर म्हणाले. पक्षाचे आमदार कार्लुस फेरेरा यांच्यावर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली असून, त्यांनी पक्षाचा प्रचार नेमका कसा असावा त्या संबंधीचा आराखडा तयार केला आहे. दक्षिण गोव्यात प्रचार प्रमुख म्हणून केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांची नेमणूक केलेली असून तेथे कालपासून प्रचाराचे काम सुरू झाल्याचे पाटकर म्हणाले.
निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटींचा भंग भाजपकडून प्रचार करताना होत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ योजनेचा सरकारी पैशांचा वापर करून आपल्या पक्षाच्या व्यासपीठावरून भाजप प्रचार करीत आहे व ते पूर्णपणे बेकायदा असल्याचा दावाही पाटकर यांनी केला.

‘ती’ शक्ती म्हणजे…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून नारी शक्तीचा अपमान केल्याचा खोटा आरोप भाजपने चालवला आहे. राहुल गांधींनी ज्या शक्तीचा उल्लेख केला होता, ती शक्ती म्हणजे मोदी यांच्या मर्जीतील अदानी यांच्यासारख्या गर्भश्रीमंत उद्योगपतींची शक्ती होय, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल स्पष्ट केले.

काँग्रेसकडूनच महिलांचे सबलीकरण : आलेमाव
काँग्रेस पक्षाने सदैव महिलांच्या सबलीकरणासाठी व उत्थानासाठी काम केल्याचे सांगून राजकीय पक्षाचे पहिले अध्यक्षपद काँग्रेसनेच एका महिलेला दिले होते याची आठवणही आलेमाव यांनी करुन दिली. काँग्रेसने सती प्रथेविरुद्ध कायदा आणला, हुंडाविरोधी कायदा केला, महिलांविरुद्ध घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा आणला, कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे र्लैगिक शोषण व अत्याचार रोखण्यासाठी त्याला प्रतिबंध करणारा कायदा आणला, असे आलेमाव म्हणाले.