>> कॉंग्रेसचे दोन्ही जिल्ह्यांमध्ये पानीपत
>> मगोला केवळ ३ जागांवर समाधान
>> मांद्रे मतदारसंघात भाजपला धक्का
>> ‘आप’ ने बाणावलीतून खाते खोलले
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत प्राप्त केले असून दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीतील १८ जागांवर, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीतील १५ जागांवर भाजपाने विजय प्राप्त केला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसची या निवडणुकीत धुळधाण उडाली असून उत्तर गोव्यात पक्षाला केवळ सांताक्रुझची एकच जागा मिळाली, तर दक्षिण गोव्यात केवळ तीन जागांवर पक्षाला समाधान मानावे लागले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने कुर्टी – खांडेपार, कवळे आणि वेलिंग – प्रियोळ अशा तीन जागांवर विजय संपादन केला, तर आम आदमी पक्षाने बाणावलीत विजय संपादन करून गोव्याच्या राजकीय क्षितिजावर आपले खाते खोलले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोलव्याची जागा जिंकून आपले अस्तित्व राखले.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या साकवाळ मतदारसंघात भाजप उमेदवाराची आधीच बिनविरोध निवड झाली होती. काल झालेल्या मतमोजणीत भाजपाने उत्तर आणि दक्षिण गोव्यात भरघोस यश संपादन केल्याचे पाहायला मिळाले. याउलट कॉंग्रेसला सासष्टी तालुक्यातील मतदारसंघांत अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्याने, तसेच काणकोण, केपे, धारबांदोडा, फोंडा, सांगे अशा सर्वच भागांमध्ये विजयी खाते खोलता न आल्याने कॉंग्रेसच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मगोला केवळ तीन जागा
या जिल्हा पंचायत निवडणुकीत सतरा उमेदवार उभे करूनही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला केवळ तीन जागा जिंकता आल्या. वेलिंग – प्रियोळ, कुर्टी आणि कवळे या मतदारसंघांमध्ये मगो आपले अस्तित्व दाखवू शकला. सध्या अंतर्गत बंडाळीच्या वावटळीत अडकलेल्या मगोसाठी हा विजय दिलासा ठरला असला तरी पक्ष अद्याप ढवळीकर बंधूंच्या प्रभावाखालून बाहेर पडला नसल्याचेही या निकालांतून अधोरेखित झाले आहे. आपण दक्षिण गोव्यात किमान दहा जागा जिंकून दाखवू असे आव्हान सुदिन ढवळीकर यांनी दिले होते, परंतु हा निकाल त्यांच्यासाठीही समाधानकारक ठरू शकला नाही.
मांद्रेमधील दोन्ही मतदारसंघांत भाजप उमेदवारांचा पराभव
उत्तर गोव्यातील मांद्रे मतदारसंघातील हरमल आणि मोरजी या दोन्ही मतदारसंघांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने आमदार दयानंद सोपटे यांच्यासाठी तो मोठा हादरा मानला जातो. हरमलमधून अपक्ष उमेदवार रंगनाथ सूर्यकांत कशाळकर, तर मोरजीमधून सतीश सीताराम शेटगावकर विजयी झाले.
लाटंबार्सेतही भाजपला धक्का
डिचोली मतदारसंघातील लाटंबार्सेमध्ये अपक्ष उमेदवार प्रदीप रेवोडकर यांनी विजय संपादन करून भाजपला धक्का दिला. भाजप उमेदवार श्रुती घाटवळ यांच्यावर रेवोडकर यांनी दोन हजार मतांनी मात केली. माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये यांना या निवडणुकीत दूर ठेवण्यासाठी हा मतदारसंघ ओबीसींसाठी राखीव करण्यात आला होता, परंतु त्याचा वचपा शेट्ये बंधूंनी रेवोडकर यांना अपक्ष म्हणून उभे करून काढला. गेली पाच वर्षे जिल्हा पंचायत सदस्य म्हणून केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याची प्रतिक्रिया संजय शेट्ये यांनी दिली. या निवडणुकीत मगोचे नरेश सावळ यांनी आपला उमेदवार उभा केला नव्हता.
कॉंग्रेसचे सपशेल पानीपत
उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे पुरते पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. उत्तर गोव्यात केवळ सांताक्रुझची एकच जागा कॉंग्रेसला जिंकता आली, तर दक्षिण गोव्यात कुडतरी, नुवे व वेळ्ळी या तीन जागांवर विजय संपादन करता आला. कॉंग्रेसने या निवडणुकीत ३८ उमेदवार उभे केले होते, परंतु त्यापैकी केवळ चारच निवडून येऊ शकले. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमध्ये त्यामुळे आता कॉंग्रेसचा केवळ एक सदस्य असेल, तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीमध्ये तीन सदस्य राहतील.
या जिल्हा पंचायत निवडणुकीद्वारे कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर हा दारुण पराभव पाहण्याची पाळी आली.
उत्तर गोवा
१ हरमल रंगनाथ कशाळकर अपक्ष
२ मोरजी सतीश शेटगावकर अपक्ष
३ धारगळ मनोहर धारगळकर भाजप
४ तोरसे सीमा खडपे भाजप
५ शिवोली सानिशा तोरसकर भाजप
६ कोलवाळ कविता कांदोळकर अपक्ष
७ हळदोणे मनीषा नाईक भाजप
८ शिरसई दीक्षा कानोळकर भाजप
९ हणजुण निहारिका मांद्रेकर भाजप
१० कळंगुट दत्तप्रसाद दाबोलकर भाजप
११ सुकूर कार्तिक कुडणेकर भाजप
१२ रेईश मागूश रुपेश नाईक भाजप
१३ पेन्ह द फ्रान्स कविता नाईक अपक्ष
१४ सांताक्रुझ शायनी ऑलिव्हेरा कॉंग्रेस
१५ ताळगाव अंजली नाईक भाजप
१६ चिंबल गिरीश उसकईकर भाजप
१७ खोर्ली सिद्धेश नाईक भाजप
१८ सेंट लॉरेन्स धाकू मडकईकर भाजप
१९ लाटंबार्से प्रदीप रेवोडकर अपक्ष
२० कारापूर-सर्वण महेश सावंत भाजप
२१ मये शंकर चोडणकर भाजप
२२ पाळी गोपाळ सुर्लकर भाजप
२३ होंडा सगुण वाडकर भाजप
२४ केरी देवयानी गावस भाजप
२५ नगरगाव राजश्री काळे भाजप
आम आदमी पक्षाने खाते खोलले
आम आदमी पक्षाने दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बाणावली मतदारसंघात विजय संपादन करून गोव्याच्या राजकारणात आपले खाते प्रथमच खोलले. आम आदमी पक्षाचे उमेदवार हेन्झेल फर्नांडिस यांनी बाणावलीत ‘आप’च्या झाडूने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना झाडत विजय संपादन केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वानिया बाप्तिस्टा यांनी कोलव्यामध्ये विजय संपादन करून आपल्या पक्षाच्या घड्याळाची टिकटिक जिवंत ठेवली.
दक्षिणेत भाजपचे यश
दक्षिण गोव्यातील उसगाव गांजे, बेतकी खांडोळा, बोरी, शिरोडा, दवर्ली, गिरदोळी, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्से, खोला, पैंगीण आदी मतदारसंघांमधून भाजपचे उमेदवार विजयी ठरल्याने दक्षिण गोव्यात या निवडणुकीत भाजपला हादरा बसणार असे मत वर्तवणार्या विरोधकांचे स्वप्न भंगल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण गोव्यातून भाजपने १७ जागा लढवल्या होत्या.
सात अपक्षांची बाजी
या निवडणुकीमध्ये सत्तरहून अधिक अपक्ष उभे राहिले होते. त्यापैकी सात अपक्ष विजयी ठरले आहेत. मांद्रे मतदारसंघातील हरमल व मोरजी या दोन्ही जागा अपक्षांनी जिंकल्या. कोलवाळ तसेच लाटंबार्सेतही अपक्ष उमेदवारास विजय मिळाला. पेन्ह द फ्रान्समध्ये कविता गुपेश नाईक या अपक्ष म्हणून निवडून आल्या.
दक्षिण गोव्यात रायमधून डॉम्निक गावकर हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले, तर कुठ्ठाळीत अपक्ष उमेदवार आंतोनियो वाझ यांनी बाजी मारली.
दक्षिणेत भाजपचे यश
दक्षिण गोव्यातील उसगाव गांजे, बेतकी खांडोळा, बोरी, शिरोडा, दवर्ली, गिरदोळी, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्से, खोला, पैंगीण आदी मतदारसंघांमधून भाजपचे उमेदवार विजयी ठरल्याने दक्षिण गोव्यात या निवडणुकीत भाजपला हादरा बसणार असे मत वर्तवणार्या विरोधकांचे स्वप्न भंगल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण गोव्यातून भाजपने १७ जागा लढवल्या होत्या.
बार्देशात भाजपची नारी शक्ती
बार्देशमधील शिवोली मतदारसंघातून भाजपच्या सानिशा सतीश तोरसकर विजयी ठरल्या, शिरसईत दीक्षा दिलीप कानोळकर, हणजुणमध्ये निहारिका नारायण मांद्रेकर, तर हळदोण्यात मनीषा महेश नाईक यांनी बाजी मारली. भाजपच्या नारीशक्तीचा हा विजय लक्षवेधी ठरला आहे.
किरण कांदोळकरांच्या पत्नी विजयी
कोलवाळ मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी करून बाहेर पडलेले किरण कांदोळकर यांची पत्नी कविता किरण कांदोळकर विजयी ठरली. त्यांनी अपक्ष म्हणून कोलवाळमधून उमेदवारी दाखल केली होती.
दक्षिण गोवा
१ उसगाव – गांजे उमाकांत गावडे भाजप
२ बेतकी-खांडोळा श्रमेश भोसले भाजप
३ कुर्टी प्रिया च्यारी मगो
४ वेलिंग-प्रियोळ दामोदर नाईक मगो
५ कवळे गणपत नाईक मगो
६ बोरी दीपक बोरकर भाजप
७ शिरोडा नारायण कामत भाजप
८ राय डॉम्निक गावकर अपक्ष
९ नुवे ऍसुसियाना रॉड्रिग्स कॉंग्रेस
१० कोलवा वानिया बाप्तिस्टा राष्ट्रवादी
११ वेळ्ळी ज्युलियांव फर्नांडिस कॉंग्रेस
१२ बाणावली हेन्झेल फर्नांडिस आप
१३ दवर्ली उल्हास तुयेकर भाजप
१४ गिरदोळी संजना वेळीप भाजप
१५ कुडतरी मिशेल रिबेलो कॉंग्रेस
१६ नावेली उमेदवार मृत झाल्यामुळे रद्द
१७ सावर्डे सुवर्णा प्रभु तेंडुलकर भाजप
१८ धारबांदोडा सुधा गावकर भाजप
१९ रिवण सुरेश केपेकर भाजप
२० शेल्डे सिद्धार्थ गावस देसाई भाजप
२१ बार्से खुशाली वेळीप भाजप
२२ खोला शाणू वेळीप भाजप
२३ पैंगीण शोभना वेळीप भाजप
२४ सांकवाळ अनिता थोरात भाजप (बिनविरोध)
२५ कुठ्ठाळी आंतोनियो वाझ अपक्ष