दरोडेखोरांना मदत केल्याचे उघड, पाच दिवसांची कोठडी
पणजी पोलीस आणि गुन्हा अन्वेषण विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नागाळी हिल्स दोनापावल येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरणात मुख्य दरोडेखोरांना मदत करणारा संशयित आरोपी महंमद याकूब अली (46, रा. कळंगुट, मूळ सहारनपूर उत्तप्रदेश) याला काल अटक केली असून येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने संशयित आरोपी महंमद अली याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
नागाळी दोनापावला येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर गेल्या 20 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री दरोडा घालून मोठा प्रमाणात ऐवज लंपास करण्यात आला आहे. पणजी पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे या दरोड्याचा तपास मागील कित्येक महिने करीत आहेत. अखेर, सहा महिन्यांनंतर दरोडा प्रकरणात मुख्य दरोडेखोरांना मदत करणाऱ्या संशयित आरोपी महंमद अली याला अटक करण्यात यश मिळविले आहे. संशयित आरोपीने दरोडेखोरांना बंगला दाखवण्यासाठी व दरोडा घालण्यात मदत केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. तसेच, दरोडा घातल्यानंतर दरोडेखोरांना आश्रय दिल्याचे समोर आले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
संशयित महंमद अली याला गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेली आहे. वास्को पोलीस स्थानक क्षेत्रात 2023 मधील एका शस्त्रात्र प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. कोलवाळ कारागृहात महंमद अली हा मुख्य दरोडेखोरांसोबत होता.
 
            