दोनदा अपयशी माणूस पंतप्रधान कसा?

0
4

>> काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्याकडून राजीव गांधींच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका नव्या विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे. अय्यर यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षणात दोनदा अपयशी ठरलेल्या व्यक्तीला पंतप्रधान कसे बनवले गेले? असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला. अय्यर यांच्या या विधानामुळे काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजीव गांधींच्या शैक्षणिक पात्रतेबाबत मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अशा व्यक्तीला देशाचे पंतप्रधान बनवले गेले, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते, असे अय्यर यांनी म्हटले आहे.

राजीव गांधी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, राजीव गांधी एक विमान वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा अनुत्तीर्ण झाले होते. केंब्रिज विद्यापीठात अनुत्तीर्ण होणे तसे कठीण आहे. कारण ते विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करते, तरीही ते अपयशी ठरले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले, तिथेही ते अपयशी ठरले. अशा व्यक्तीला भारताचे पंतप्रधान कसे काय बनवले गेले, असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला. दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर भाजपा नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.