दैवगती

0
10
  • ज. अ. रेडकर

आणि राधाची नियुक्ती उत्तर गोवा जिल्हाधिकारी पदावर झाली. भवानीशंकर आणि गौरी यांची छाती अभिमाने फुलून आली. परमेश्वराने त्यांच्या पदरात टाकलेले वरदान सुफळ संपन्न झाले होते आणि तेवीस वर्षांपूर्वी एका अभागी महिलेने त्यागलेल्या जिवाचे आयुष्य मार्गी लागले होते.

झुंजूमुंजू पहाट झाली. पूर्व दिशेला लाल आणि सोनेरी रंगांची पखरण झाली. इतक्यात ‘राधा-रमण’ बंगल्याच्या गॅलरीत बांधलेला मोती जोरजोरात भुंकू लागला. मडगावचे प्रतिष्ठित व्यापारी भवानीशंकर यांचा हा बंगला. मोती का भुंकतोय म्हणून त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि ते बाहेर आले. साखळीला बांधलेला त्यांचा मोती फाटकाच्या दिशेने तोंड करून जोरजोरात भुंकत होता. भवानीशंकर यांनी त्याला थोपटले, पण तो भुंकायचा थांबेना. त्याचे भुंकणे ऐकून इतर बंगल्यातीलही कुत्री भुंकायला लागली होती. पटापट इतर बंगल्यांचे दरवाजे उघडले. एकमेकांच्या गॅलरीतून चौकशा सुरू झाल्या. अलीकडे शहरात चोरांचा सुळसुळाट खूप वाढला होता. त्यामुळे लोक सतर्क झाले होते. कुत्री भुंकली की सर्वजण जागे व्हायचे. पोलिसांची गस्तही वाढली होती. इतक्यात भवानीशंकर यांना गेटवरील दिव्याच्या उजेडात त्यांच्या गेटला कसले तरी गाठोडे अडकवलेले आहे असे दिसले. ते लगबगीने पायऱ्या उतरून गेटपाशी आले.
भवानीशंकर यांनी गाठोडे उघडून पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या गाठोड्यात चिमणा जीव डोळे मिटून शांत झोपी गेला होता. गाठोड्यात एक लहानशी चिठ्ठी होती. ‘साहेब, ही पोरगी मी तुमच्या पदरात घालते आहे. याचे तुम्ही मायबाप व्हा! -एक अभागी अबला’! भवानीशंकर गोंधळून गेले. कोण असेल ही अभागी महिला आणि तिने माझ्याच बंगल्याच्या दारात हे गोजिरवाणे बाळ का टाकले असेल? असे काय घडले म्हणून त्या अभागी महिलेला आपल्या पोटचा गोळा टाकावा लागला असेल? ही महिला आपल्याला ओळखत असेल का? अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यात घोंगावू लागले. त्यांनी बाळाला घरात आणले. इतक्यात त्यांची पत्नी गौरी जागी झाली. तिच्या हातात हे गोजिरवाणे बाळ त्यांनी ठेवले आणि लगेच जवळच्या पोलीस स्थानकाला सर्व हकीगत कळवली. पोलिसांचे पथक आले. रीतसर पंचनामा झाला. दुसऱ्या दिवशी नियमानुसार कोर्टासमोर ही गोष्ट यायला पाहिजे होती आणि नंतरच भवानीशंकर या बाळाचे कायदेशीर पालक होऊ शकले असते.

गौरी आणि भवानीशंकर यांच्या विवाहाला पंधरा वर्षे उलटून गेली होती, पण त्यांना अपत्यप्राप्ती नव्हती. सर्व सुखे हात जोडून समोर उभी होती पण अपत्य सुख नशिबी नव्हते. याचे दुःख त्या दोघानांही होते. सर्व वैद्यकीय उपचार झाले, कुलदेवतेला नवस करून झाले, व्रतवैकल्ये केली, कोण सांगेल ते उपाय गौरीने केले पण तिची कूस काही उजवली नाही. त्यांनी आता अपत्यप्राप्तीची आशाच सोडून दिली होती. मात्र आज अचानकपणे परमेश्वरच प्रसन्न झाला होता आणि त्यांच्या हातात एक गोजिरवाणे बाळ ठेवून गेला होता. हा एक चमत्कारच होता. गौरीला खूप आनंद झाला. कधीतरी ‘भिक्षांदेही’ म्हणत दारात आलेल्या जटाधारी बैराग्याने दिलेला आशीर्वाद तिला आठवला. त्या बैराग्याने दिलेले वरदान म्हणजेच हे गोंडस बाळ होय असा विश्वास तिला वाटू लागला. गौरीने त्या इवल्याशा जिवाला पोटाशी कवटाळले, पटापट मुके घेतले. बाळ जागे झाले आणि गोड हसले. गौरी बाळाला घेऊन देवघरात आली. बाळाला पाटावर ठेवले. डोळे मिटून ती देवाची प्रार्थना करू लागली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. भवानीशंकर आपल्या पत्नीची अवस्था दुरूनच न्याहाळत होते. तेदेखील भावूक झाले होते.
दुसऱ्या दिवशी बाळ आणि पंचनाम्याचे कागद कोर्टासमोर सादर करण्यात आले. कोर्टाने बाळाचा तात्पुरता ताबा भवानीशंकर आणि गौरीला दिला आणि पोलीस यंत्रणेला आदेश दिला की, या बाळाच्या आईबापाचा शोध घेण्यासाठी जेवढे करता येईल तेवढे करा आणि दोन महिन्यांनी शोध-अहवाल घेऊन पुन्हा माझ्याकडे या, त्यानंतरच मी अंतिम निर्णय देईन. तोपर्यंत हे बाळ भवानीशंकर कुटुंबाकडे राहील. बाळाची योग्य ती काळजी भवानीशंकर आणि त्यांची पत्नी गौरी यांनी घ्यावी. पोलिसांनी कोर्टाला एक कडक सॅल्युट ठोकला आणि त्या दिवशीची सुनावणी संपली.

दोन महिन्यांनी पुन्हा कोर्टात केस गेली. पोलिसांकडून सर्व प्रयत्न केले गेले पण बाळाच्या आई-बापाचा शोध लागला नसल्याचा अहवाल दिला गेला. आता बाळाचा रीतसर ताबा भवानीशंकर आणि त्यांची पत्नी गौरी यांना देण्यात आला. गेल्या दोन महिन्यांत गौरीचा जीव टांगणीला लागला होता. आज तिने सुस्कारा सोडला. गेल्या दोन महिन्यांत गौरीला या छोट्या मुलीचा लळा लागला होता. आता ही छोटी परी कायमची त्यांच्याकडे राहाणार होती. तिच्या येण्याने घर आनंदाने भरून गेले. कितीतरी वर्षांची उणीव परमेश्वराने भरून काढली होती. भवानीशंकर आणि गौरी यांनी या छोट्या मुलीचा नामकरण विधी मोठ्या थाटात संपन्न केला. तिचे नाव मोठ्या आवडीने ‘राधा’ ठेवले. दिसामासांनी राधा मोठी होत होती. तिच्या बाललीलांचे भवानीशंकर आणि गौरी यांना कोण कौतुक! राधा भवानीशंकर यांच्या घरात आली आणि त्यांच्या भरभराटीला सुरुवात झाली. व्यापार वाढला. अनेक वर्षे अडकून पडलेली येणी वसूल झाली. राधा त्यांच्यासाठी सुदैवी पायगुणाची ठरली.
काळ मागे सरत होता. भवानीशंकर आणि गौरी यांच्या आनंदात राधा नेहमीच भर टाकीत होती. आज राधा एकवीस वर्षांची झाली होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचा निकाल आला. राधा परीक्षेत अव्वल आली. भवानीशंकर आणि गौरी यांना आकाश ठेंगणे झाले. राधाला आयएएस अधिकारी व्हायचे होते म्हणून तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. दोन वर्षे राधाने सर्व संदर्भग्रंथ, मासिके, रोजची दैनिके यांचे वाचन केले आणि आपले सर्वसामान्य ज्ञान अद्ययावत केले. यूपीएससीच्या परीक्षेला सामोरे जाण्यास ती पूर्ण सज्ज झाली आणि पहिल्याच प्रयत्नात इथेही अव्वल स्थानी आली. प्रशिक्षणाचा भाग म्हणून तिला मसुरीला जावे लागले. इतक्या वर्षांत प्रथमच ती आपल्या आई-वडिलांना सोडून दूर जाणार होती. वास्तविक तिला नोकरी करायची कोणतीच गरज नव्हती. भवानीशंकर यांच्याकडे गडगंज पैसा, इस्टेट होती आणि ते सारे तिचेच होते. परंतु मुलीच्या इच्छेआड त्यांना यायचे नव्हते. तिला अधिकारी होऊन समाजाचे भले करायचे असेल तर करू देत, असा विचार करून त्यांनी तिच्या शिक्षणात कधीच अडसर निर्माण केला नव्हता, तसा आजही केला नाही. त्यांना पूर्ण खात्री होती की आपली मुलगी जे करील ते चांगलेच करील.
सहा महिन्यांचा प्रशिक्षण काळ संपला आणि राधाची नियुक्ती उत्तर गोवा जिल्हाधिकारी पदावर झाली. भवानीशंकर आणि गौरी यांची छाती अभिमाने फुलून आली. त्यांची प्रतिष्ठा आणखीनच वाढली. परमेश्वराने त्यांच्या पदरात टाकलेले वरदान सुफळ संपन्न झाले होते आणि तेवीस वर्षांपूर्वी एका अभागी महिलेने त्यागलेल्या जिवाचे आयुष्य मार्गी लागले होते. ही दैवगतीच नाही काय?