देश-विदेशात मृत्यूतांडव

0
14

>> थायलंड : २३ चिमुरड्यांचा मृत्यू

थायलंडमध्ये गुरुवारी एका माथेफिरूने पाळणाघरात घुसून बेछुट गोळीबार केला. त्यात चिमुरड्यांसह एकूण ३१ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे आरोपी माजी पोलीस अधिकारी होता. त्याने या गोळीबारानंतर स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केली. मृतांमध्ये २३ लहान मुले, दोन शिक्षक, एका पोलीस अधिकारी व अन्य काहींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या माथेफिरू माजी पोलीस कर्मचार्‍याने दुपारच्यावेळी पाळणाघरात बेछुट गोळीबार केला. इतकेच नाही, तर आपल्याजवळील चाकूनेही हल्ला केला. त्यात अनेक चिमुरड्या मुलांचा गोळी लागून किंवा चाकूने भोसकल्याने मृत्यू झाला.

मेक्सिको : १८ जण मृत्यूमुखी

मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन या भागात काल गोळीबाराची घटना घडली. या भीषण हल्ल्यात एकूण १८ जणांचा मृत्यू झाला असून, ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेत मेक्सिकोचे महापौर कॉनरॅडो मेंडोझा यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे.

मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन येथील सिटी हॉल परिसरात हा गोळीबार झाला. लॉस टेक्विलेरोस या गुन्हेगारी टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या टोळीच्या सदस्यांनी तसा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रदर्शित केला आहे. मात्र येथील स्थानिक अधिकार्‍यांनी हा हल्ला कोणी केला, हे अद्याप सांगता येणार नाही, असे सांगितले आहे.

केरळ : ५ विद्यार्थ्यांसह ९ जण ठार

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये बुधवारी मध्यरात्री दोन बसचा भीषण अपघात घडला. केरळच्या केएसआरटीसीची बस पर्यटक बसला धडकल्याने घडलेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच या अपघातात ३८ जण जखमी झाली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, एक पर्यटक बस एर्नाकुलम जिल्ह्यातील बसलियोस विद्यानिकेतनच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन उटी येथे पर्यटनासाठी जात होती, तर त्याचवेळी केएसआरटीसीची बस कोईम्बतूरच्या दिशेने निघाली होती. वडक्कनचेरी येथे दोन्ही बसची समोरासमोर धडक बसली. त्यात पर्यटक बसमधील पाच विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा, तर केएसआरटीसी बसमधील तिघांचा मृत्यू झाला.

पश्‍चिम बंगाल : नदीत ७ जण बुडाले

पश्चिम बंगालमध्ये बुधवारी रात्री उशिरा दुर्गा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपाईगुडी येथील माल नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ७ जणांचा बुडून मृत्यू झाला.
जलपाईगुडी येथे दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी माल नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने जोरदार प्रवाहात अनेक लोक वाहून गेले. तसेच पाण्यात वाहून जाणार्‍या लोकांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. या घटनेनंतर लगेचच जिल्हा प्रशासनाने विसर्जनाचा कार्यक्रम थांबवून लोकांच्या बचावकार्यास सुरुवात केली. यावेळी नदीत बुडालेल्या ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तसेच १० जखमींनाही बाहेर काढण्यात आले.