सुमारे दोन महिन्यांच्या खंडानंतर देशातील विमान सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र विविध राज्यांच्या स्वत:च्या या संदर्भातील नियम-अटींमुळे या संदर्भात काही प्रमाणात गोंधळयुक्त वातावरण आहे. विशेषत: मोठ्या प्रमाणातील कोरोना रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्र, प. बंगाल व तामिळनाडू या राज्यांनी तूर्त विमानसेवा सुरू करण्यास विरोध जाहीर केल्याने गोंधळ असल्याची चर्चा आहे.
विमान सेवा सुरू करण्यास काही राज्यांनी विरोध दर्शविल्याने विमान कंपन्यांसह विमान वाहतूक अधिकार्यांसमोर ही सेवा सुरू करण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या. प्रवासी विमान वाहतुकीबाबत महाराष्ट्र, तामिळनाडू व प. बंगालमधील विमानतळ हे गजबजलेले असतात. दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लाल विभागांमधील विमान सेवा सुरू करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता व बागडोगरा विमानतळ सुरू करणे दोन दिवस लांबणीवर टाकण्यास आपण केंद्र सरकारला सांगणार असे म्हटले होते.
या गोंधळाच्या वातावरणात काल विविध विमान कंपन्या व राज्ये यांच्या प्रतिनिधींनी विमान प्रवाशांसाठी क्वॉरंटाईन सुविधा तसेच कोरोना संबंधित अन्य नियम, सूचना, एसओपी यावर चर्चा केली. या बैठकीत मुख्य भर होता तो क्वॉरंटाईन नियमाबाबत प्रमाणीकरण असण्यावर. मात्र या मुद्द्यावर काय अंतिम निर्णय झाला हे समजू शकले नाही.
दरम्यान कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, आसाम व आंध्र प्रदेश यांच्या सरकारांनी प्रवाशांसाठी असलेले आपापले क्वॉरंटाईनचे नियम जाहीर केले आहेत.
देशांतर्गत प्रवासासाठी सरकारतर्फे नव्याने मार्गदर्शक सूचना जारी
देशांतर्गत प्रवास करणार्या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. अशा प्रवाशांनी या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करावा लागणार आहे. तसेच सर्व राज्यांनी विमानतळ, रेल्वे स्थानके व बस स्थानकांवरील प्रयाण केंद्रांवर अशा प्रवाशांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रिनिंग सुविधा तैनात करावी लागणार आहे.
प्रवाशांना स्वत:वर १४ दिवस निगराणी ठेवण्यास सांगून कोरोना लक्षणे नसलेल्या प्रवाशांना प्रवास करण्यास मान्यता द्यावी लागणार आहे. प्रवास एजन्सीने प्रवाशांना तिकिटे देताना काय करावे व काय करू नये याबाबतची माहिती प्रवाशांना द्यावी लागणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारतीय रेल्वेने १ जूनपासून रेलगाड्यांच्या १०० जोड्या सुरू करणार असल्याचे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर वरील मंत्रालयाने या सूचना जारी केल्या आहेत. दुरोंतोस, संपर्क, क्रांती, जनशताब्दी, पूर्वा एक्स्प्रेस अशा रेलगाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच दोन महिन्यांच्या खंडानंतर विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी उद्या दि. २५ पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.