देशात 24 तासांत कोरोनाने 5 मृत्यू

0
7

>> एका दिवसात आढळले 602 नवे बाधित

देशात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनामुळे पाचजणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या जेएन.1 व्हेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. देशातील कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एक दिवसापूर्वी देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट नोंदवण्यात आली होती, मात्र काल पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 602 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात कोविड-19 च्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4500 च्या पुढे गेली आहे.

जेएन.1 चे रुग्ण वाढले
कोरोना विषाणू जेएन.1 च्या नवीन प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहेत. कोरोना जेएन.1 प्रकार हा ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात या नवीन जेएन.1 सब-व्हेरियंटचे 312 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4,565 वर पोहोचली आहे.

24 तासांत 602 रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 602 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4365 वर पोहोचली आहे. एक दिवस अगोदर, 2 जानेवारीला देशात 573 नवीन रुग्ण आढळले होते आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याआधी 1 जानेवारी रोजी देशात 636 नवीन रुग्ण आढळले होते आणि कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता.

देशातील कोरोनाची स्थिती
भारतात कोरोनाचा नवा जेएन.1 व्हेरियंट खूप वेगाने पसरत आहे. आतापर्यंत दहा राज्यांमध्ये जेएन.1चे रुग्ण आढळले आहेत. केरळमधून 147, तामिळनाडूतून 22, कर्नाटकातून 8, गोव्यात 51, गुजरातमध्ये 34, महाराष्ट्रात 26 आणि दिल्लीत 16 रुग्णांची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये 5, तेलंगणात 2 आणि ओडिशात 1 रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जेएन.1 व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहे, पण धोकादायक नाही. मात्र, यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.