देशात मुसलमान लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ

0
88

देशातील मुसलमान समाजाची लोकसंख्या सन २००१ ते २०११ या दहा वर्षांत तब्बल २४ टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले आहे. देशाच्या लोकसंख्या वाढीची राष्ट्रीय सरासरी १८ टक्के असून हे प्रमाण त्याहून अधिक आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुसलमान बांधवांची संख्या १३.४ टक्क्यांवरून १४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. गोव्यात या समुदायाचे प्रमाण ६.८ टक्क्यांवरून ८.४ टक्क्यांवर पोहोचले आहे.देशात जम्मू काश्मीरमध्ये मुसलमान समाजाची लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे ६८.३ टक्के आहे. त्यानंतर आसामचा क्रमांक लागतो. तेथे ही संख्या ३४.२ टक्के आहे. तिसरे मुसलमानबहुल राज्य पश्‍चिम बंगाल असून तेथे हे प्रमाण २७ टक्के आहे.
१९९१ ते २००१ या काळात मुसलमान समुदायाच्या लोकसंख्येची वाढ सरासरी २९ टक्क्यांनी होत असे. गेल्या दशकात या समुदायाची लोकसंख्या आसाममध्ये सर्वाधिक प्रमाणात वाढत असल्याचे आढळून आले असून २००१ मध्ये राज्याच्या ३०.९ टक्के असलेले मुसलमान बांधव आता ३४.२ टक्के आहेत. बांगलादेशी स्थलांतरांचीही त्यात भर पडली आहे. केवळ मणिपूरमध्ये मुसलमान समुदायाची लोकसंख्या ८.८ टक्क्यांवरून ८.४ टक्के अशी घटली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये २००१ मधील २५.२ टक्क्यांवरून २०११ मध्ये त्यांची संख्या २७ टक्के झाली आहे. उत्तराखंडमध्ये ११.९ टक्क्यांवरून १३.९ टक्के, केरळमध्ये २४.७ टक्क्यांवरून २६.६ टक्के, हरयाणात ५.८ टक्क्यांवरून ७ टक्के आणि दिल्लीत ११.७ टक्क्यांवरून १२.९ टक्के वाढ झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या जनगणना महानिबंधकांनी मार्च २०१४ पर्यंतची ही माहिती गोळा केली असून मागील सरकारने ही माहिती जाहीर केली नव्हती. लवकरच ही माहिती अधिकृतरीत्या जाहीर केली जाईल असे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. संघप्रदेशांपैकी लक्षद्वीपमध्ये मुसलमान समुदाय बहुसंख्य म्हणजे ९६.२ टक्के आहे. ही सर्व आकडेवारी २०११ च्या सरकारी जनगणनेतील आहे. मात्र ती जाहीर करण्यात चार वर्षे विलंब झालेला आहे.