देशात मान्सून पुन्हा सक्रिय होणार

0
9

आजपासून अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर देशभरात आजपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज 21 आणि 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारणपणे 23 ऑगस्टच्या दरम्यान हवामानात थंडावा असेल.
राजस्थानमध्ये 16 ऑगस्टपासून हलक्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक आहे. येत्या काही दिवसांत पूर्व राजस्थानच्या काही भागांत मान्सून सक्रिय होण्याची दाट शक्यता असून, त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. आज व उद्या म्हणजेच दि. 21 व 22 रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो तसेच पुढील आठवड्याभरात वातावरणात फारसा बदल नसेल असंही हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचे प्रमाण सुरूच आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे डोंगराळ भागांत विद्ध्‌‍वंस झाला आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत भूस्खलनाच्या घटना घडत असून अनेकांचा मृत्यूही झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 आणि 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय 24 ऑगस्टपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे. उत्तराखंडमध्ये काल हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून आज व उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओरिसामध्ये आज हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील पावसामुळे हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारमध्ये तसेच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशमध्ये 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.