देशात क्रूझ पर्यटनाला वाव

0
15
  • शशांक मो. गुळगुळे

जलमार्ग हा भारताचा एक खजिना आहे. आपल्या देशाला प्रचंड लांबीचा समुद्र लाभला असल्यामुळे समुद्री क्रूझ पर्यटन यशस्वी होऊ शकेलच; पण कित्येक नद्या या महाकाय असल्यामुळे नदी क्रूझ पर्यटनही भारतात यशस्वी होऊ शकेल.

पर्यटन व्यवसाय हा आपल्या देशाला आर्थिक बळ देणारा तसेच आर्थिक व्यवहारांना चालना देणारा उद्योग आहे. या उद्योगासाठी भांडवली खर्चही फार होत नाही. आपल्या देशाच्या पर्यटनामध्ये प्रचंड वैविध्य आहे. कित्येक थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रचंड समुद्रकिनारे आहेत. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. मोठमोठी जंगले आहेत, महाकाय नद्या आहेत, मनोवेधक वास्तू आहेत. दिल्लीतली महात्मा गांधी यांची समाधी हा स्थापत्त्यशास्त्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट नमूना मानला जातो. पण आपल्या देशाला जलपर्यटनाला (क्रूझ पर्यटन) भरपूर वाव द्यायचा आहे, अशी माहिती भारत सरकारचे बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी नुकतीच मुंबईत दिली.

भारतीयांनी परदेशी पर्यटन करावे, पण आपल्या देशातही पर्यटन करावे. उदाहरणच द्यायचे तर मुंबईतला एखादा माणूस पर्यटनासाठी जर कोकणात आला- कोकणात उद्योग जवळ जवळ नसल्यातच जमा आहेत- तर तो माणूस कोकणात हॉटेलात राहणार. तेथे खर्च करणार. तेथे काही खरेदी करणार. परिणामी कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. असे आपण भारतीयांनी वर्षातून एकदा तरी देशांतर्गत पर्यटनाला पसंदी दिली तर भारतभर आर्थिक व्यवहारांत वाढ होऊ शकेल. आपल्या पंतप्रधानांनी आपल्या भाषणात बऱ्याच वेळा सांगितले आहे की, ‘जेथे जाल तेथे स्थानिक वस्तू खरेदी करा!’ याचे कारण, स्थानिक वस्तू खरेदीमुळे त्या ठिकाणांची आर्थिक उलाढाल वाढते. तसेच परदेशी पर्यटकही त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे आपल्या देशाची परकीय चलनाची स्थिती सुधारू शकते.

कोस्टा क्रूझेस
केवळ भारतासाठी समर्पित केलेला एक नवीन क्रूझ कार्यक्रम ‘कोस्टा क्रूझेस’ भारतात सुरू होणार आहे, अशी घोषणा सर्बानंद सोनोवाल यांनी नुकतीच केली. इटलीच्या या कंपनीने भारतासाठी ‘कोस्टा सेरेना’ हे जहाज निवडले आहे. 4 नोव्हेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत एकूण 23 क्रूज पर्यटनाचे कार्यक्रम देशांतर्गत ठिकाणांना भेट देणार आहेत. परिणामी भारतीयांना आपल्याच देशातील काही सुंदर ठिकाणे अनोख्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. हा जलपर्यटन प्रवास मुंबई, कोचीन, गोवा व लक्षद्वीप असा होणार आहे. ‘कोस्टा सेरेना’ हे भारतातील देशांतर्गत प्रवासाचे संचलन करणारे सर्वात मोठे क्रूझ जहाज असेल. केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना असे वाटते की, जलमार्ग हा भारताचा एक खजिना आहे. भारताला प्रचंड लांबीचा समुद्र लाभला असल्यामुळे आपल्या देशात समुद्री क्रूझ पर्यटन यशस्वी होऊ शकेलच; पण आपल्या देशात कित्येक नद्या या महाकाय असल्यामुळे नदी क्रूझ पर्यटनही भारतात यशस्वी होऊ शकेल. भारतीयांनी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश’ ही संकल्पना मांडली. ही यशस्वी होऊ देणे हे भारतीयांच्या हातात आहे. जलपर्यटनामुळे प्रदूषणात भर पडत नाही. रस्त्यांवर फार मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन बरीच माणसे नाहक दगावतात. जलपर्यटनात अपघातांची जोखीम फारच कमी असते. ‘कोस्टा सेरेना’मध्ये 1500 केबिन्स आहेत. यात वेलनेस सेंटर, व्यायामशाळा, ब्युटी सलून, थिएटर, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भोजन देणारी रेस्टॉरन्ट्स, स्विमिंगपूल, शॉपिंग एरिया आणि मुले व किशोरवयीन मुलांसाठी एक किड्स क्लबही आहे.

भारतातील क्रूझ सेवा
भारतात सध्या मुंबई, गोवा, लक्षद्वीप, केरळ बॅक वॉटर, सुंदरबन, अंदमान, कोची, मालदीव, गंगा व ब्रह्मपुत्रा नद्या येथे क्रूझसेवा उपलब्ध आहेत. सुंदरबन नदी क्रूझ, ब्रह्मपुत्रा नदी क्रूझ, दिब्रू साईखोवा नदी क्रूझ, गंगा हेरिटेज नदी क्रूझ, अंदमान बेटे क्रूझ व गोवा क्रूझ या सध्या देशातील लोकप्रिय क्रूझसेवा आहेत. भारतातून परदेशात क्रूझने थायलंड, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, मालदिव, इंडोनेशिया, दुबई व आशिया टूर्स या सेवा उपलब्ध आहेत. संपूर्ण जग जलपर्यटनाने म्हणजे क्रूझने फिरायचे असल्यास एका माणसाला साधारणपणे रुपये 25 लाख खर्च येतो. क्रूझ या शब्दाचे मूळ डच भाषेत आहे. भारतात चेन्नई, गोवा, कोचिन, मंगळूर व मुंबई ही क्रूझची पाच मुख्य बंदरे आहेत. एम. व्ही. गंगा विलास ही भारतातली सर्वात मोठी क्रूझसेवा आहे. हिचा प्रवास उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून सुरू होतो. 51 दिवसांच्या प्रवासात ही क्रूझ 3,200 किलोमीटर पाणी कापते. ही बांगलादेशमार्गे आसाममध्ये दिब्रूघरपर्यंत जाते. भारत व बांगलादेशातल्या एकूण 27 नद्यांतून हिचा प्रवास होतो. केरळ हे भारतातील क्रूझ पर्यटनासाठी सर्वात लोकप्रिय राज्य आहे. केरळ बॅकवॉटर क्रूझ अतिशय लोकप्रिय आहे. भारतात सुमारे 100 क्रूझ जहाजे आहेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझसेवेचे उद्घाटनही केंद्रीय जलमार्ग मंत्री सोनोवाल यांनी 5 जानेवारी 2023 रोजी केले होते. एम. व्ही. एम्प्रेस ही क्रूझसेवा चेन्नई ते श्रीलंका अशी सुरू झाली होती. क्रूझ व्यवसाय सुमारे पंधरा हजार जणांना रोजगार देतो. यापैकी 50 टक्के रोजगार गोवा राज्यात आहेत. क्रूझ पर्यटनासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी चांगला असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

क्रूझ पर्यटनाचे प्रकार
समुद्रात क्रूझ सेवा, नद्यांत क्रूझ सेवा, एकट्याने करायचे क्रूझ पर्यटन, कौटुंबिक क्रूझ पर्यटन, वरिष्ठ नागरिकांसाठी तसेच पती-पत्नीसाठीचे क्रूझ पर्यटन, लक्झरी क्रूझ पर्यटन, साहसी क्रूझ आदी क्रूझ पर्यटनाचे प्रकार आहेत. रेल्वे, विमान किंवा रस्तामार्गे पर्यटन करणाऱ्यांचे प्रमाण भारतात जितके आहे तितके जलपर्यटन करणाऱ्यांचे प्रमाण भारतात नाही. यात फार मोठ्या प्रमाणावर वाढ व्हायला हवी. या पर्यटनाने प्रदूषणनिर्मिती होत नाही. रस्तामार्गे पर्यटन करण्यामुळे प्रदूषणात बरीच भर पडते. नुसते क्रूझ पर्यटनच नाही तर जलमार्गे प्रवासी वाहतूकही फार मोठ्या प्रमाणावर भारतात सुरू होऊ शकते. जलमार्गे प्रवासी सेवा फार मोठ्या प्रमाणावर सुरू झाली तर इतर सेवांवर सध्या जो ताण आहे तो कमी होऊ शकतो. कित्येक प्रवासी वाहतूक सेवांवर ताण असल्यामुळे अपघातही होतात, तेही कमी होतील.