देशात कोरोना रुग्णांची संख्या १०२

0
183
New Delhi: Passengers wear protective face masks in wake of novel coronavirus (COVID 19) pandemic at New Delhi Railway Station, Sunday, March 15, 2020. (PTI Photo/Arun Sharma)(PTI15-03-2020_000116B)

>> महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण, केंद्राकडून कोरोना आपत्ती घोषित

देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत असून देशात १०१ संशयित रुग्ण सापडले आहेत. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जगभरात आत्तापर्यंत ५८३३ जणांनी आपले प्राण करोनामुळे गमावले आहेत. इटलीत कोरोनाच्या मृतांचा आकडा १२०० च्या वर गेला आहे. अमेरिका आणि स्पेनने आणीबाणी घोषित केली आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक काल रविवारपासून बंद केली आहे मात्र सीमेवरील मोजक्याच पोस्टवर अत्यावश्यक गरजांसाठी वाहतूक सुरू राहील. भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमधून रस्तेमार्गे होणारी प्रवासी वाहतूक १५ मार्च मध्यरात्रीपासून, तर पाकिस्तानबरोबरची सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक १६ मार्च मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा अधिकारी किंवा एखाद्या देशाच्या राजदुताला भारतात यायचे झाल्यास त्याला अटारी-वाघा सीमेवरून संपूर्ण तपासणी करूनच भारतात प्रवेश दिला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. भारत-बांगलादेश रेल्वे आणि बससेवा १५ एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहे.

कोरोना आपत्ती घोषित
दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना व्हायरस ही आपत्ती घोषित केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबीयांना ४ लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारे आपत्ती निधीचा उपयोग करू शकतील. कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर इंडिगोने १७ मार्चपासून दुबई, शारजाह व अबुधाबीची उड्डाणे रद्द करीत असल्याचे जाहीर केले.

सिनेमा, मालिकांचे चित्रिकरण रद्द
दरमयान, काल रविवारी १५ मार्च रोजी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत १९ ते ३१ मार्चपर्यंत कोणत्याही सिनेमाचे किंवा मालिकांचे चित्रिकरण रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सार्क राष्ट्रांच्या नेत्यांशी
पंतप्रधानांनी केली चर्चा
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे सार्क राष्ट्रांच्या नेत्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी सार्क राष्ट्रांना कोरोनाशी एकत्रितपणे लढण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, यासाठी आकस्मिक निधी उभा करण्याचे सर्व राष्ट्रांना आवाहन करत, भारताकडून यासाठी १ कोटी डॉलरचा निधी देण्याचीही मोदींनी तयारी दर्शवली. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुरू असलेल्या या चर्चेत पंतप्रधान मोदींसह श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, मालदीव, भूतान व नेपाळ या राष्ट्रांच्या प्रमुखांचा सहभाग आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सार्क राष्ट्रांना एकत्र करत कोविड-१९ साठी आपत्कालीन निधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाय राजपक्षे, याचबरोबर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

१९ जणांचा अहवाल नकारात्मक

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील खास कोरोना वॉर्डात एका कोरोना संशयित रुग्णावर उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णाचे रक्त तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३४४ प्रवाशांचे स्क्रिनिंग रविवारी करण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडे ६५ प्रवाशांनी घरीच निरीक्षणासाठी नोंदणी केली आहे. बांबोळी येथील इस्पितळातून कोरोना संशयित २० जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. त्यातील १९ जणांच्या रक्त तपासणी अहवाल नकारात्मक आलेला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

गोव्यात आजपासून
शैक्षणिक संस्था बंद
कोरोना रोगाच्या जागतिक साथीच्या पार्श्‍वभूमीवर आज सोमवार दि. १६ मार्चपासून राज्यातील अंगणवाडीपासून शाळा-महाविद्यालयांपर्यंतचे वर्ग ३१ मार्चपर्यंत ठेवण्यता आले आहेत. त्याशिवाय राज्यातील सिनेमागृहे, कॅसिनो, स्पा, व्यायामशाळा, सार्वजनिक स्विमिंंग पूल, डिस्को क्लब, पर्यटकांना सहलीसाठी घेऊन जाणार्‍या बोटी व बसेसही आजपासून बंद राहणार आहेत. दि. ३१ मार्चनंतर सरकार या बंदीचा फेरआढावा घेणार आहे. सरकारने काढलेल्या अधिसूचनेत रविवार दि. १५ रोजी रात्रौ १२ वाजल्यापासून बंदी लागू होणार असल्याचे म्हटले असले तरी खर्‍या अर्थाने आज सोमवारपासून शाळा, सिनेमागृहे, स्पा आदी बंद होणार आहेत.
आणिबाणीचा प्रसंग म्हणून सरकारने ही बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्याची पाळी आली असल्याच सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले. या बंदीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याने सरकारी तिजोरीच कधी नव्हे एवढे नुकसान होण्याची शक्यताही सूत्रानी व्यक्त केली आहे.

पर्यटन क्षेत्राला मोठा फटका
गोवा हे एक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असून या बंदीचा सर्वांत मोठा फटका राज्याच्या पर्यटन व्यवसायाला बसणार आहे. राज्यात येणार्‍या पर्यटन व्यवसायाला बसणार आहे. राज्यात येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांचा आकडा यापूर्वीच कमी झालेला असून केंद्राने विदेशी पर्यटकांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा यापूर्वीच बंद केला असल्याने पर्यटन क्षेत्रातील व्यवसायीक चिंतेत आहेत.

विदेशात काम करणारे अडकले
विदेशांत नोकरी करणार्‍या गोमंतकीयांचा आकडा मोठा असून विदेशातून सुट्टीसाठी घरी आलेले व तेथून घरी येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गोमंतकीयांची फार मोठी अडचण झालेली आहे. खास करून क्रुझ बोटीवर काम करणार्‍यांसाठी हा काळ कसोटीचा ठरला आहे.