>> नीती आयोगाचा इशारा, दैनंदिन रुग्ण ४ ते ५ लाख होण्याची शक्यता
नीती आयोगाने देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना आता तिसर्या लाटेचा धोका असून त्यामुळे दैनंदिन चार ते पाच लाख नागरिक बाधित सापडतील असेही आयोगाने म्हटले आहे.
देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरून आता हळूहळू व्यवहार पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. बाजारपेठा खुल्या होत असून देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होत आहे. मात्र आता निती आयोगाने तिसर्या लाटेचा इशारा दिल्यामुळे चिंता वाढली आहे.
नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सरकारला याबाबत महत्त्वाची आकडेवारी सादर केली असून देशातील नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनादेखील केल्या आहेत. तिसर्या लाटेबाबत या अहवालात अनेक शिफारसीदेखील करण्यात आल्या असून देशाला भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे असाही इशारा दिला आहे. तिसरी लाट जेव्हा टोक गाठेल तेव्हा देशात दैनंदिन ४ ते ५ लाख नवे कोरोनाबाधित सापडू शकतील, असा अंदाजही आयोगाने व्यक्त केला आहे.
२ लाख आयसीयू
बेड सिद्ध ठेवा
देशात जवळपास २ लाख आयसीयू बेड तयार ठेवावे लागतील, असा अंदाजही नीती आयोगानं सरकारला दिला आहे. याशिवाय ५ लाख ऑक्सिजन बेड आणि १० लाख आयसोलेशन केअर बेडची गरज वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, नीती आयोगाने यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये देशात दुसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. मे महिन्यातील काही दिवस देशात आढळणार्या कोरोना रुग्णांचा आकडा हा ४ लाखांवर नोंदवला जात होता. त्यानंतर आता नीती आयोगाने तिसर्या लाटेचा अंदाज वर्तवत सरकारला सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे.