>> कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी दोन, तर गुजरातमध्ये एका रुग्णाची नोंद
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) ह्या विषाणूचे देशात एकाच दिवसात 5 रुग्ण सापडले असूून, ह्या नव्या विषाणूच्या शिरकावामुळे देशवासीयांची चिंता वाढली आहे. गोव्याच्या शेजारील कर्नाटक राज्यात एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय तामिळनाडूच्या चेन्नईत 2 रुग्ण सापडले. तसेच गुजरातमध्येही 1 रुग्ण सापडला आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या मुलाला आणि तीन महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. तसेच गुजरातच्या अहमदाबादमधील 2 महिन्यांच्या मुलालाही त्याची बाधा झाली आहे. या रुग्णांवर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना ह्या विषाणूचा सर्वाधिक धोका आहे.
आत्तापर्यंत एचएमपीव्हीचे फक्त चीनमध्येच रुग्ण आढळत होते; मात्र कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये देशातील पहिला रुग्ण आढळून आला. आठ महिन्यांच्या बाळाला या विषाणूने ग्रासले आहे. या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही. याशिवाय एचएमपीव्हीचा दुसरा रुग्णही बंगळुरुतच आढळला. एका तीन महिन्यांच्या मुलीला त्याची बाधा झाल्याचे समोर आले. दोन्ही रुग्णांवर बंगळुरुतील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती. सध्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून, मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत आहे.
कर्नाटकातील दोन्ही प्रकरणांबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुले नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, मुलांचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत नव्हे तर खासगी रुग्णालयात तपासण्यात आल्याचे कर्नाटक आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कर्नाटकपाठोपाठ गुजरातच्या अहमदाबादमध्ये 2 महिन्यांच्या मुलालाही एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याविषयी चांदखेडा येथील ऑरेंज हॉस्पिटलचे डॉ. नीरव पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडासाजवळील एका गावात राहणाऱ्या दोन महिन्यांच्या चिमुरडीची प्रकृती खालावल्याने त्याला 15 दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाला सर्दी आणि खूप ताप होता. सुरुवातीला त्यांना पाच दिवस व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. त्यानंतरच्या अनेक चाचण्यांमध्ये मुलाला एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे आढळले. मुलाची प्रकृती आता स्थिर आहे, घाबरण्याची गरज
नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काय माहिती दिली?
भारतातील एचएमपीव्हीच्या स्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची तीन प्रकरणे आढळून आली आहेत. या तिन्ही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.
उपाय काय?
हात स्वच्छ ठेवणे, मास्क घालणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंग हे एचएमपीव्हीचे संक्रमण टाळण्यासाठी महत्त्वाचे उपाय आहेत.
एचएमपीव्ही आणि त्याची लक्षणे काय?
एचएमपीव्ही हा आरएनए विषाणू आहे, ज्यामुळे सहसा सर्दीसारखी लक्षणे दिसतात. यामुळे घशात खोकला किंवा घरघर होऊ शकते. वाहणारे नाक किंवा घसा खवखवणे असू शकते. तसेच छातीत घरघर आणि श्वसनास त्रास अशी याची लक्षणे आहेत. थंड हवामानात त्याचा धोका जास्त असतो.
एचएमपीव्ही विषाणू कसा पसरतो?
खोकल्याने आणि शिंकण्याद्वारे एचएमपीव्ही विषाणू पसरतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. संक्रमित व्यक्तीशी हस्तांदोलन करून किंवा विषाणूने संक्रमित झालेल्या कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्याने देखील त्याचा प्रसार होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर 3 ते 5 दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात.
केंद्राकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी झाल्यास काटेकोर पालन : राणे
केंद्र सरकारने अद्याप राज्यांसाठी एचएमपीव्ही संबंधित कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. केंद्राकडून निर्देश प्राप्त होतील तेव्हा त्यांचे राज्यात काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.