देशातील पहिले विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र गोव्यात सुरू : मुख्यमंत्री

0
16

>> योजनेच्या नोंदणीमध्ये गोवा दुसऱ्या स्थानी; मडगावात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेखालील प्रशिक्षणाचा शुभारंभ

देशातील पहिले ‘पंतप्रधान विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र’ गोव्यात सुरू झाले असून, योजनेसाठीच्या नोंदणीच्या बाबतीत आम्ही दुसऱ्या स्थानावर असलो, तरीही प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात प्रथम क्रमांकावर आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. 18 क्षेत्रांमध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. काहींना फक्त 18 जाती दिसतात; पण राज्य सरकारने 32 उद्योगांकडे करार केलेला आहे. भविष्यात फक्त पदवी घेतल्यानंतर किमान एक वर्ष कामाचा अनुभव किंवा ॲप्रेंटिसशिप असणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मडगाव येथील रवींद्र भवनात कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयातर्फे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेखालील प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या योजनेंतर्गत 10 कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, राज्याचे कायदा व न्यायमंत्री आलेक्स सिक्वेरा, राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे, एनआरआय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आतापर्यंत कोणत्याही सरकारने पारंपरिक काम करणाऱ्यांचा आदर केला नाही. हा मान-सन्मान डबल इंजिनच्या भाजप सरकारने दिला. ॲप्रेंटिसशिप अंतर्गत दहा हजार रोजगार देण्याचा सरकारने संकल्प केला असून, आतापर्यंत 9 हजार तरुणांना रोजगार दिला आहे. सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पारंपरिक उद्योग करणाऱ्यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे दिली जात आहेत. त्यानंतर त्यांना कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे. सख्खा भाऊ कर्ज घेताना जामीनदार म्हणून सही करण्यास तयार नसतो. अशावेळी फक्त मोदी की गॅरंटी चालते व त्यांना विनातारण कर्ज मिळते. नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण या चार तत्त्वांसाठी सरकार काम करते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकार देशातील युवकांना भविष्यासाठी सज्ज, उद्योग सज्ज बनविण्याच्या दिशेने काम करीत आहे, ज्यामध्ये उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि लोकांना त्यांच्या कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगार मिळेल, असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.
यावेळी गुरू सन्मान कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील कारागिरांचा सत्कार करण्यात आला. पहिली तुकडी सुरू झालेल्या केंद्रांमध्ये 9 सरकारी आयटीआय आणि मत्स्य संचालनालयाचे 1 केंद्र समाविष्ट आहे. योजनेच्या अंतर्गत पारंपारिक व्यवसाय ज्यात सुतार, बोट बनविणारा, लोहार, शिल्पकार, सुवर्णकार, कुंभार यांना प्रशिक्षण केंद्रांवर उच्च कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेसाठी आतापर्यंत विविध व्यवसायातील 29 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे.

केवळ पदव्या नको; कौशल्य हवे : चंद्रशेखर
आजकाल केवळ शैक्षणिक पदव्या असणे पुरेसे नाही. काम पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे चांगले कौशल्य असणे आवश्यक आहे. कौशल्य प्राप्तीसाठी सरकार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक घरात किमान एक कुशल व्यक्ती असेल, असे राजीव चंद्रशेखर म्हणाले.