देशाच्या 1 इंचभरही जमिनीबाबत तडजोड करणार नाही : पंतप्रधान

0
6

गुजरातच्या कच्छमध्ये भारतीय सैन्यातील जवानांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील कच्छमध्ये भारतीय सैन्यातील जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदींनी दिवाळीत जवानांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान मोदींनी कच्छमध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांना मिठाई खाऊ घातली. देशाची सेवा केल्याबद्दल पंतप्रधानांनी सैनिकांचे आभार मानले. तसेच, आपल्या नेतृत्वातील सरकार देशाच्या एक इंचही जमिनीबाबत तडजोड करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 11व्यांदा सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधान गुजरातमधील कच्छमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांना मिठाई खाऊ घातली. तत्पूर्वी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 149 व्या जयंती आणि एकता दिनानिमित्त मोदी गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले होते.

कच्छमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जवानांना संबोधित केले. सीमाभागातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आहे. आम्ही शत्रूच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही, तर आमच्या सैन्याच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. तुमच्यामुळे हा देश सुरक्षित आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

नौदल आणि हवाई दलाला स्वतंत्र दल म्हणून पाहिले जाते, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांची ताकद अनेक पटींनी वाढते. भारत आपल्या जमिनीशी एक इंचभरही तडजोड करू शकत नाही, म्हणूनच आमची धोरणे आमच्या सशस्त्र दलांच्या संकल्पाशी सुसंगत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारत-चीन सैनिकांकडून
एकमेकांना मिठाई वाटप

भारत-चीन सीमेवरील देप्सांग आणि देम्चोक येथून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर काल दिवाळीनिमित्त चीन आणि भारताच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई वाटली. गस्तीबाबत लवकरच ग्राऊंड कमांडरच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.