देशभरात यंदा मान्सून ‘सामान्य’ राहणार

0
26

>> स्कायमेटने वर्तवला अंदाज; जनू ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या ९८ टक्के पाऊस

हवामानाची माहिती देणार्‍या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जारी केला आहे. यंदा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या ९८ टक्के राहण्याची शक्यता आहे. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचे दमदार आगमन होईल, असेही भाकित वर्तवले आहे.

स्कायमेटने यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, त्यावेळी यावर्षी मान्सून सामान्य असेल असे सांगितले होते. स्कायमेटने काल पुन्हा एकदा आपल्या अंदाजाचा पुनरुच्चार केला.

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच, पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणार्‍या लोकांवरही त्याचा खोलवर परिणाम होतो. भारतीय हवामान विभाग या महिन्याच्या अखेरीस आपला अंदाज जाहीर करणार आहे.

राजस्थान आणि गुजरातसह नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा धोका असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. याशिवाय जुलै-ऑगस्ट महिन्यात केरळ आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात पावसात थोडीशी घट होऊ शकते. स्कायमेटच्या मते, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील कृषी क्षेत्र, तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. मान्सूनचा पूर्वार्ध उत्तरार्धापेक्षा चांगला असेल अशी अपेक्षा आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.